साखर साठवणुकीवर आणखी निर्बंध; व्यापाऱ्यांसाठी मर्यादा एक हजार क्विंटल

आवडल्यास ही बातमी शेअर करा

१५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान अंमलबजावणी

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात ग्राहकांना वाजवी दरात पुरेशी साखर उपलब्ध व्हावी, यासाठी सरकारने साखर व्यापाऱ्यांवरील साठवणुकीचे निर्बंध अधिक कडक केले आहेत. व्यापाऱ्यांची साठामर्यादा एक हजार क्विंटलपर्यंत कमी करण्यात आली असून, हा नियम १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत लागू राहणार आहे. व्यापाऱ्यांना साखरेचा साठा केवळ १५ दिवसांपर्यंत ठेवता येणार आहे.

साठेबाजीला आळा घालणे, सट्टेबाजी रोखणे आणि वितरकांकडे अतिरिक्त साठा जमा होऊ न देणे, हा या निर्णयाचा उद्देश आहे. साखरेचे प्रमाण आणि साठवणुकीचा कालावधी मर्यादित ठेवून पुरवठा साखळीतील वाहतूक सुरळीत करणे तसेच ग्राहकांना सातत्याने साखर उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर आहे.

सुधारित नियम कोलकाता आणि त्याच्या विस्तारित महानगरीय क्षेत्रांसह आसामलाही लागू होणार आहेत. मात्र, या भागांसाठी स्थानिक बाजारपेठेच्या गरजा लक्षात घेऊन साठामर्यादा दोन हजार क्विंटल निश्चित करण्यात आली आहे.

कोलकाता येथे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकातून साखर खरेदी केली जाते. तेथून पूर्व आणि ईशान्य भारतात तिचा पुरवठा होतो. आसामसाठी मर्यादा ठरवताना भौगोलिक परिस्थिती, वाहतूक सुविधा आणि ईशान्य भारतातील ग्राहकांची मागणी विचारात घेतल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

यापूर्वी ऑगस्टमध्ये सरकारने वितरकांसाठी १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर या कालावधीत चार हजार क्विंटलची साठामर्यादा लागू केली होती. खरेदीच्या तारखेपासून जास्तीत जास्त ३० दिवस साठा ठेवण्याची परवानगी होती. त्यानंतर १५ सप्टेंबरपासून ही मर्यादा दोन हजार क्विंटलपर्यंत कमी करण्यात आली होती.

दरम्यान, साखरेच्या सरासरी किरकोळ किमती ऑगस्टमधील उच्चांकाच्या तुलनेत १५ टक्क्यांनी घसरल्या आहेत. पुरवठा साखळीत कमी दराने साखर उपलब्ध होत असल्याने किरकोळ किमतींमध्ये आणखी घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »