सिद्धेश्वर कारखान्याकडून दुष्काळ निवारणासाठी मदत!

सोलापूर : यंदा दुष्काळाची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्री दुष्काळ सहायता निधीसाठी श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना आणि श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी यांच्याकडून प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. एकूण ५० लाख रुपयांच्या या मदतीची घोषणा कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी केली.
कारखान्याच्या ५४ व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन रविवारी झाले. यावेळी काडादी बोलत होते. होमहवनाचा मान संचालक महादेव जम्मा आणि त्यांच्या पत्नी शोभा जम्मा यांना मिळाला. अध्यक्ष पुष्पराज ऊर्फ अण्णाराज काडादी व त्यांच्या पत्नी तेजश्री काडादी, उपाध्यक्ष सिद्धराम चवडके आणि जम्मा दामप्पा यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. कार्यकारी संचालक एम. बी. अय्यणी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
काडादी म्हणाले, परिसरातील चारही तालुक्यांत यंदा समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे उसाच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तयारी पूर्ण असलेल्या कारखान्यांना शासनाने १ ऑक्टोबरपासून गाळप सुरू करण्याची परवानगी दिली आहे. आसपासच्या कारखान्यांमधील स्पर्धा आणि पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन गळीत हंगाम लवकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मागील दोन हंगामांत गाळप कमी झाल्याने कारखान्याला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. परिणामी, काही शेतकऱ्यांची देयके थकीत राहिली. ही बिले देण्यासाठी बँकांच्या माध्यमातून आर्थिक व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे काडादी यांनी सांगितले. कारखान्याने कर्जाची फेररचना केली असून, त्यावरील व्याज शासन भरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कामगारांना दिवाळीपूर्वी वेतन व बोनस
कारखान्यातील कामगारांना दिवाळीपूर्वी एक महिन्याचे वेतन आणि बोनस देण्यात येणार आहे. कारखान्याच्या ग्राहक भांडारातून कामगारांना सेवा सुरू राहणार असून, त्यांचे हप्ते आणि पगारवाढीचे प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन काडादी यांनी दिले.
इतर कारखान्यांच्या तुलनेत सिद्धेश्वर कारखान्याचा प्रतिटन खर्च १०० रुपयांनी अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. मशीनच्या सेटिंगमध्ये बदल करून उसाचे वाढे वाचविल्यास दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी चारा उपलब्ध होऊ शकेल, असेही काडादी म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धराम बळवळकर यांनी केले.






