उसाला प्रतिटन पाच हजारांचा दर द्या; सदाभाऊ खोतांची केंद्राकडे मागणी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन किमान पाच हजार रुपये दर मिळावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. साखरेचा किमान विक्री दर वाढविण्यासह इथेनॉलच्या दरातही वाढ करावी आणि साखर कारखान्यांमधील अंतराची अट हटवावी, अशा मागण्याही त्यांनी मांडल्या.

महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी रयत क्रांती संघटना आणि किसान संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकरी दिल्लीकडे निघाले होते. मात्र, नोएडा येथे पोलिसांनी त्यांना रोखल्याने शेतकऱ्यांनी तेथेच आंदोलन सुरू केले. दिल्लीच्या सीमेवर अनेक शेतकऱ्यांच्या गाड्या अडविण्यात आल्यामुळे त्यांना नियोजित आंदोलनस्थळी पोहोचता आले नाही.

दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी दिल्लीतील टिळक मार्ग पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. रयत क्रांती संघटनेसह विविध शेतकरी संघटनांनी जंतरमंतर येथे आंदोलन करण्याचे नियोजन केले होते.

साखर आणि इथेनॉलच्या दरवाढीची मागणी

दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना खोत यांनी ऊस उत्पादकांच्या प्रमुख मागण्या स्पष्ट केल्या. उसाला प्रतिटन किमान पाच हजार रुपये दर देण्याबरोबरच एफआरपीमधील रिकव्हरीच्या प्रत्येक एक टक्क्यासाठी प्रतिटन ५०० रुपये दर निश्चित करावा, अशी मागणी त्यांनी केली.

साखरेचा किमान विक्री दर प्रतिकिलो ३१ रुपयांवरून ५० रुपये करावा आणि इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७५ रुपये निश्चित करावा, असेही त्यांनी सांगितले. तसेच, २५ किलोमीटरच्या परिघातील दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट हटविण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

रोहित पवार यांच्यावर टीका

यावेळी खोत यांनी आमदार रोहित पवार यांच्यावरही टीका केली. साखर कारखानदारी आणि सहकार क्षेत्रातील पवार कुटुंबाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत, शेतकऱ्यांना प्रतिटन पाच हजार रुपये दर देण्याचे आव्हान त्यांनी रोहित पवार यांना दिले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »