ऊस कपातीची सक्ती टाळा, गाळप परवाने द्या; ‘विस्मा’ची मागणी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : साखर कारखान्यांना गाळप परवाने देताना सर्व ऊस कपातीचा आग्रह धरू नये किंवा त्याची सक्ती करू नये, अशी मागणी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांना निवेदन दिले आहे.

राज्यात यंदाच्या गळीत हंगामासाठी साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्याची प्रक्रिया सुरू आहे. गाळप परवाने जारी करण्यासंदर्भातील शासकीय निर्णय, आदेश आणि पत्रांना मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून, गाळप परवाने नाकारू नयेत, असे स्पष्ट केल्याचे विस्माने निवेदनात नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर ऊस कपातीची अट सक्तीने लागू न करता कारखान्यांना परवाने द्यावेत, अशी संघटनेची भूमिका आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत ऊस गाळपाचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. मात्र, गाळप परवाने देताना उच्च न्यायालयाच्या आदेशाचा विचार करून त्याचा आदर राखणे आवश्यक असल्याचे विस्माने म्हटले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाचा आदर राखून खासगी साखर कारखाने त्यानुसार कार्यवाही आणि अंमलबजावणी करतील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. आता या मागणीवर साखर आयुक्तालय कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »