केंद्राच्या कडक कारवाईचा परिणाम; साखरेचे दर किलोमागे ५ रुपयांनी घसरले

नवी दिल्ली : गेल्या महिन्यात साखरेच्या दरात झालेली तब्बल २४ टक्क्यांची वाढ केंद्र सरकारच्या कठोर हस्तक्षेपानंतर आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे. प्रति किलो ५६ ते ६० रुपयांच्या उच्चांकावर पोहोचलेल्या साखरेच्या किमती आता घाऊक आणि किरकोळ बाजारात सुमारे ५ रुपयांनी कमी झाल्या आहेत.
साखरेच्या दरवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने साठेबाजांविरोधात धडक कारवाई करत छापे टाकले. तसेच व्यापाऱ्यांवर कडक साठा मर्यादा लागू करण्यात आली. देशांतर्गत बाजारात पुरवठा वाढवण्यासाठी १ लाख टन विनाशुल्क कच्ची साखर आयात करण्याचाही निर्णय घेण्यात आला. या उपाययोजनांचा थेट परिणाम बाजारभावावर झाला असून साखरेच्या दरात घसरण झाली आहे.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष प्रकाश नाईकनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबरपूर्वी ब्राझीलमधून कच्च्या साखरेची पहिली मोठी खेप भारतीय बंदरांवर पोहोचण्याची शक्यता आहे. थायलंडमध्ये सध्या साखरेचा तुटवडा असल्याने भारतासाठी ब्राझील हा प्रमुख आणि व्यवहार्य आयात पर्याय ठरत आहे.
ब्राझीलहून साखर भारतात पोहोचण्यासाठी सागरी मार्गाने साधारण ४० ते ४५ दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, ३१ ऑक्टोबरपर्यंत आयात प्रक्रियेबाबत केंद्र सरकार लवचिक भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आयात केलेली साखर बाजारात उपलब्ध झाल्यानंतर दर आणखी स्थिर राहण्यास मदत होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.






