साखर दरवाढीच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादकांच्या अपेक्षा पल्लवित

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : साखरेच्या बाजारभावात अचानक मोठी वाढ झाल्याने साखर उद्योगासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत. गुरुवारी साखरेच्या दराने विक्रमी पातळी गाठत प्रतिक्विंटल सुमारे ६५०० ते ७२०० रुपयांपर्यंत मजल मारल्याची माहिती बाजारातील सूत्रांनी दिली. गेल्या काही दिवसांत झालेल्या या अनपेक्षित दरवाढीमुळे साखर बाजारात विविध चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या पंधरवड्यात साखरेच्या दरात प्रतिक्विंटल सुमारे १५०० रुपयांची वाढ झाली आहे. आता साध्या साखरेला ६२५० ते ६३०० रुपये, तर उच्च प्रतीच्या साखरेला सुमारे ७२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, साखरेच्या दरातील या अनाकलनीय वाढीची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय अन्न मंत्रालयाने १७ ते १९ ऑगस्टदरम्यान साखरेची विक्री कोणत्या दराने आणि किती प्रमाणात झाली, याचा तपशील साखर कारखान्यांकडून मागविला आहे.

देशात २०२५-२६ हंगामाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात शिल्लक साखर साठा उपलब्ध होता. त्यातून निर्यात झाल्यानंतरही देशांतर्गत गरजा भागवून पुढील हंगामासाठी काही प्रमाणात साखर शिल्लक राहणे अपेक्षित होते. मात्र, सध्या बाजारात साखरेचा तुटवडा जाणवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे साठेबाजी आणि साखरेची उपलब्धता याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

साखरेच्या दरवाढीचा थेट फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्गाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. साखरेला सातत्याने चांगला दर मिळाल्यास आगामी गाळप हंगामातील उसाच्या दरावरही त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे साखरेच्या वाढत्या दराकडे ऊस उत्पादकांचे विशेष लक्ष लागले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »