गुळाच्या बाजाराला कोल्ड स्टोअरेजमधील साठ्याचा आधार!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सोलापूर :  दुष्काळजन्य परिस्थितीमुळे नव्या गुळाच्या गुणवत्तेला फटका बसला असून, सोलापूरच्या बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी कोल्ड स्टोअरेजमधील गुळाचा आधार घ्यावा लागत आहे. दुसरीकडे, गुळाच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांनी खरेदीचे प्रमाण कमी केले आहे. पूर्वी दहा किलो गूळ घेणारे ग्राहक आता अर्धा ते एक किलो खरेदी करत असल्याचे चित्र आहे.

अपेक्षित पाऊसच न झाल्याने उसाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी तयार होणाऱ्या गुळाची प्रत घसरली आहे. गुळाचा रंग आणि दर्जा बिघडल्याने बाजारात गुणवत्तापूर्ण गुळाची कमतरता जाणवत आहे.

सध्या नव्या गुळाची आवक कमी असल्यामुळे कोल्ड स्टोअरेजमध्ये साठवलेल्या मागील वर्षाच्या गुळावर व्यापाऱ्यांना अवलंबून राहावे लागत आहे. सोलापूर बाजारात दररोज दहा ते बारा हजार गूळ ढेपांची आवक होत असून, मागील वर्षीच्या तुलनेत त्यात मोठी वाढ झाली आहे.

आवक कमी झाल्याने मागील वर्षी प्रतिक्विंटल ३,८०० ते ४,००० रुपये असलेला गुळाचा दर आता ५,५०० ते ५,६०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. किरकोळ बाजारात गुळाचा दर किलोमागे ८० रुपये, तर होलसेल बाजारात ५५ रुपये आहे. वाढलेल्या दरांमुळे ग्राहकांच्या खरेदीवर परिणाम झाला असून, अनेक जण गरजेपुरताच गूळ घेत आहेत.

नव्या गुळाचा दर्जा घसरला
सोलापूर बाजारात विविध भागांतून गुळाची आवक होत असली तरी नव्या गुळामध्ये अपेक्षित दर्जा मिळत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या साठवलेल्या गुळाला मागणी वाढली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »