साठा मर्यादा हटताच साखरेच्या दरात मोठी वाढ!

पुणे : केंद्र सरकारने साखरेच्या साठ्यावर घातलेली मर्यादा हटवल्यानंतर साखर बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. एस-३० ग्रेड साखरेचा क्विंटलचा दर पुन्हा ५२०० रुपयांवर पोहोचला असून, गेल्या काही दिवसांत दरात सुमारे २०० रुपयांची वाढ झाली आहे.
शनिवारी बाजारात साखरेचा प्रतिक्विंटल दर ५२०० रुपयांपर्यंत पोहोचला. त्यामुळे साखरेच्या दरवाढीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून अतिरिक्त दोन लाख टनांचा कोटा जाहीर करण्याची मागणी होत आहे.
गत महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एस-३० ग्रेड साखरेचा दर सुमारे ४०७० रुपयांवर होता. त्यानंतर महिनाभरात दरात १००० रुपयांपर्यंत वाढ झाली. या अनपेक्षित आणि वेगवान दरवाढीमुळे देशभरातील साखर दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्राकडून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
देशातील सर्वाधिक साखर उत्पादन करणाऱ्या महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश या प्रमुख राज्यांतील कारखान्यांसाठी अतिरिक्त साखर कोटा खुला केल्यास दर नियंत्रणात येण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, साखर कारखान्यांनी निविदांचे दर वाढवल्याने बाजारातील दर दिवसागणिक वाढत आहेत. सध्याच्या परिस्थितीत साखरेच्या निविदा प्रतिक्विंटल ४८५० ते ४९५० रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे घाऊक बाजारातील साखरेचा दर ५२०० रुपयांवर पोहोचल्याने किरकोळ बाजारातही साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.






