ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

राज्यातील ३९ कारखान्यांकडे एफआरपी थकीत

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत ऊस बिल मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्यातील ३९ साखर कारखान्यांकडे एफआरपीची तब्बल २५६ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संबंधित कारखान्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्यातील साखर हंगाम बंद होऊन पाच महिन्यांहून अधिक कालावधी लोटला आहे. मात्र, काही कारखान्यांनी अद्याप ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संपूर्ण एफआरपी अदा केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

साखर आयुक्तालयाच्या माहितीनुसार, गेल्या गळीत हंगामात राज्यातील २१० साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. जानेवारीपासून साखर कारखाने उसाच्या गाळपानंतर बंद होण्यास सुरुवात झाली. मार्चपर्यंत राज्यातील सर्व साखर कारखाने बंद झाले.

एप्रिलपर्यंत उसाचे संपूर्ण पैसे देणे अपेक्षित होते. मात्र, जूनपर्यंतही ३९ साखर कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली नाही. या कारखान्यांकडे एकूण २५६ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दहा कारखान्यांवर आरआरसीची कारवाई

एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांविरोधात साखर आयुक्तालयाने कारवाई सुरू केली आहे. राज्यातील दहा साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करण्यात आली असून, संबंधित कारखान्यांकडून शेतकऱ्यांची थकबाकी वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातील अनेक कारखाने सोलापूर जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना ऊस बिल वेळेत मिळावे आणि एफआरपीची रक्कम थकीत राहू नये, यासाठी साखर आयुक्तालयाकडून संबंधित कारखान्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका घेतली जात आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »