कोल्हापुरात ऊसतोड मजुरांसाठी कॅशलेस उपचाराची सुविधा

कोल्हापूर : जिल्ह्यातील ऊसतोड हंगामात येणाऱ्या सर्व ऊसतोड मजुरांना वैद्यकीय उपचार सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी त्यांचे कॅशलेस कार्ड काढण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात ऊसतोड कामगार महामंडळाच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ऊसतोड कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र कर्मचारी प्रत्यक्षात ऊसतोड कामगार आहेत का, याची खातरजमा करण्याचे निर्देश देण्यात आले.
न्यायालयातील एका रिट याचिकेच्या अनुषंगाने ऊसतोड मजुरांबाबत आवश्यक माहिती सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. ऊसतोडीचा हंगाम साधारण ऑक्टोबरपासून सुरू होतो. या काळात कामगारांसोबत त्यांच्या मुलांचेही स्थलांतर होते. त्यामुळे मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी साखर कारखानदारांनी विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.
जिल्ह्यात सुमारे दीड लाखांपर्यंत ऊसतोड कामगार असून, त्यापैकी स्थानिक तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या कामगारांची संख्या निश्चित करण्याबाबतही माहिती मागविण्यात आली आहे. कारखान्यांच्या प्रतिनिधींनी साधारण एक ते दीड लाख ऊसतोड कामगार दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत कार्यरत असल्याची माहिती दिली.
दरम्यान, पांजरपोळाबाबतची अट शिथिल करण्याची मागणी कारखानदारांच्या प्रतिनिधींनी केली. बैठकीला समाजकल्याण विभागाचे अधिकारी, प्रकल्प संचालक, विविध ग्रामीण विकास संस्थांचे प्रतिनिधी तसेच जिल्ह्यातील साखर कारखानदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.






