आगीचा कहर; दहा एकर ऊस जळून खाक

बाभळेश्वर, ता. श्रीरामपूर : महावितरणच्या तांबेवाडी विद्युत वाहिनीवरील कट पॉइंटवर शॉर्टसर्किट झाल्याने बाभळेश्वर बुद्रुक परिसरातील सुमारे दहा एकर ऊस आगीत जळाल्याची घटना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
आग लागल्याचे समजताच परिसरातील शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच साखर कारखान्याच्या अग्निशामक विभागाशी संपर्क साधण्यात आला. अग्निशामक दलाचे वाहन वेळेत दाखल झाले; मात्र शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने ते आगीच्या ठिकाणी पोहोचू शकले नाही. त्यामुळे आग विझविण्यात मोठ्या अडचणी आल्या आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत उभा ऊस जळाला.
या घटनेनंतर विद्युत वाहिन्यांची नियमित देखभाल आणि दुरुस्ती केली जाते का, असा सवाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. प्रशासन आणि महावितरणने तातडीने नुकसानीचा पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन कट पॉइंट व विद्युत वाहिन्यांची पाहणी करावी. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.






