उसाला प्रतिटन ६,५०० रुपये द्या; अन्यथा कारखाने सुरू होऊ देणार नाही

— किसान सभेचा इशारा
कोल्हापूर : स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार ‘सी-२ अधिक ५० टक्के’ या सूत्राच्या आधारे उसाला प्रतिटन ६,५०० रुपये दर जाहीर करावा, अशी मागणी राज्य किसान सभेच्या ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्यात करण्यात आली. शेतकऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय दर निश्चित करू नये आणि दर जाहीर होईपर्यंत साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा निर्धारही उपस्थितांनी व्यक्त केला.
येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात झालेल्या या मेळाव्याला किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर, राज्य सचिव गिरीश फोंडे यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि ऊस उत्पादक उपस्थित होते.
यावेळी राजन क्षीरसागर यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. कॉर्पोरेट कंपन्यांना अनुकूल धोरणांचा शेतकऱ्यांवर परिणाम होत असल्याचा आरोप त्यांनी केला. ऊस कारखान्यांमधील रिक्त पदांवर शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी द्यावी, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी संघटितपणे लढावे, असे आवाहन त्यांनी केले.
१५ ऑक्टोबरपासून कारखाने सुरू करण्याच्या निर्णयावर गिरीश फोंडे यांनी प्रश्न उपस्थित केला. ऊस अद्याप परिपक्व नसताना कारखाने सुरू करायचे असतील, तर शेतकऱ्यांना अतिरिक्त अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. उसाचा दर जाहीर होईपर्यंत कारखाने सुरू होऊ देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मेळाव्यात साखरेसह मळी, बगॅस, वीज आणि इथेनॉल या उत्पादनांमधील मूल्यनिर्मितीचा ७५ टक्के वाटा शेतकऱ्यांना देण्याची, साखरेची किमान विक्री किंमत प्रतिकिलो ५० रुपये करण्याची, तसेच शक्तिपीठ महामार्ग रद्द करून त्यासाठीचा निधी दुष्काळग्रस्त भागांतील पाणीपुरवठ्यासाठी वापरण्याची मागणी करणारे ठराव मंजूर करण्यात आले.
याप्रसंगी शेतजमीन वाचवण्यासाठी लढा उभारणाऱ्या जिल्ह्यातील ४५ गावांतील ग्रामस्थांचा आणि शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.






