शेतकऱ्यांच्या उपस्थितीतच वजनकाट्यांची पडताळणी करा; साखर आयुक्तांचे निर्देश

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : आगामी ऊस गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांमधील वजनकाट्यांची पडताळणी, मुद्रांकन व सीलिंग प्रक्रिया शेतकरी गट आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्याचे निर्देश साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिले आहेत. ही प्रक्रिया पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने राबविण्याच्या सूचना सर्व प्रादेशिक साखर सहसंचालकांना देण्यात आल्या आहेत.

वैधमापन शास्त्र विभागामार्फत वजनकाट्यांची तपासणी आणि सीलिंग करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी विभागाकडून समन्वय साधला जात असून, निर्धारित दिवशी शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील, याची व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित प्रादेशिक साखर सहसंचालकांवर सोपविण्यात आली आहे.

मुद्रांकन आणि सीलिंगसाठी वैधमापन शास्त्र विभागाकडून निश्चित करण्यात येणाऱ्या वेळापत्रकानुसार पूर्वतयारी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. प्रक्रियेदरम्यान अडचणी येऊ नयेत, यासाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय आणि स्थानिक शेतकरी संघटनांशी तातडीने समन्वय साधून सहभागी शेतकरी गट व संघटनांच्या प्रतिनिधींची नावे आधीच निश्चित करावीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

वजनकाट्यांशी संबंधित तक्रारींच्या निवारणासाठी व्हॉट्सॲप क्रमांक कारखानास्थळी प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. वैधमापन विभागाचा तक्रार निवारण क्रमांक तसेच संबंधित प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाचा व्हॉट्सॲप क्रमांक निश्चित करून ते १० ऑक्टोबरपूर्वी कारखानास्थळी प्रसिद्ध होतील, याची दक्षता घेण्याच्या सूचना साखर आयुक्तांनी दिल्या आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »