मराठवाड्यातील ऊस गाळपाची जबाबदारी सोलापूर जिल्हयावर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सोलापूर : मराठवाडय़ात यंदा शिल्लक उसाचा प्रश्न भीषण आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाडय़ातील सर्व उसाचे गाळप हे सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांमार्फत केले जाणार असून ते पूर्ण होईपर्यंत सोलापूरचे साखर कारखाने सुरूच राहणार आहेत.

देशात सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापुरात यंदाच्या गळीत हंगामात दोन कोटी १६ लाख ८१ हजार ४६३ टन ऊस गाळप होऊन दोन कोटी ३ लाख ४५ हजार ४५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सध्या जिल्ह्यातील ऊस संपत असताना शेजारच्या मराठवाडय़ातील सुमारे २२ लाख टन ऊस गाळपासाठी सोलापूरच्या साखर कारखान्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे अद्यापि २३ साखर कारखाने सुरूच आहेत. मराठवाडय़ातील ऊस संपेपर्यंत म्हणजे ५ मेपर्यंत सोलापूरचे साखर कारखाने सुरूच राहणार आहेत.


तथापि, एकीकडे सोलापुरात ऊस जवळपास गाळप झाला असताना दुसरीकडे मराठवाडय़ातून थेट जालन्यासारख्या दूरच्या अंतरावरून ऊस गाळपासाठी आणताना वाहतूक खर्च वाढला आहे. तसेच ऊसतोड मजूर टोळय़ांचीही कमतरता भासू लागली आहे. या प्रश्नांचे आव्हान स्वीकारत साखर कारखान्यांना गाळप हंगाम चालवावा लागत आहे.

सोलापूर जिल्ह्यात एकूण ४० पैकी ३३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम गेल्या १५ आक्टोंबरपासून सुरू झाला होता. यात ११ सहकारी तर २२ खासगी कारखान्यांचा समावेश होता. आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल दोन कोटी १६ लाख ८१ हजार ४६३ टन ऊस गाळप झाला असून दोन कोटी ३ लाख ४५ हजार ४५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यात सरासरी साखर उतारा ९.३८ टक्के एवढा मिळाला आहे. सध्या माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना आणि माळशिरस तालुक्यातील पांडुरंग सहकारी साखर कारखाना आदी मोजक्या कारखान्यांचा अपवाद वगळता बहुतांश कारखान्यांकडील ऊस संपत आला आहे. माढा, करमाळा, मोहोळ, पंढरपूर तालुक्यात ऊस शिल्लक आहे. त्यामुळे येत्या २५ एप्रिलपर्यंत किमान दहा साखर कारखान्यांचा पट्टा पडण्याची अपेक्षा आहे. उर्वरित कारखाने टप्प्याटप्प्याने गाळप हंगाम संपवतील. विठ्ठलराव शिंदे, पांडुरंग यासारखे काही मोजक्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम ५ मेपर्यंत लांबण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठवाडय़ात मागील तीन वर्षांत चांगला पाऊस झाल्यामुळे उसाची लागवड वाढली आहे. तेथील साखर कारखान्यांच्या एकूण गाळप क्षमतेपेक्षा जास्त ऊस शिल्लक राहात असल्यामुळे हा शिल्लक ऊस गाळपासाठी सोलापुरातील कारखान्यांकडे आणला जात आहे. जालना, औरंगाबाद, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड आदी जिल्ह्यात मिळून अद्यापि सुमारे २२ लाख मे. टन ऊस शिल्लक असल्यामुळे तो सोलापुरात आणला जात असल्याचे प्रादेशिक उपसंचालक (साखर) पांडुरंग साठे यांनी सांगितले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »