कृष्णा कारखान्यावर भोसले गटाचेच पुन्हा वर्चस्व

सहकार पॅनेलची विजयाची हॅटट्रिक
कराड: यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीत जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने मोठी आघाडी मिळवून आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी रेठरे बुद्रुक येथे भव्य विजयी रॅली काढण्यात आली असून, पॅनेलच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला आहे.
भोसले समर्थकांचा उत्साह मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच भोसले पॅनेलने घेतलेली आघाडी निकालात रूपांतरित होताना पाहून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. या विजयी रॅलीमध्ये कारखान्याचे मार्गदर्शक डॉ. सुरेश भोसले, आमदार डॉ. अतुल बाबा भोसले आणि विनायक भोसले स्वतः सहभागी झाले होते. त्यांच्या उपस्थितीत निघालेल्या या रॅलीने संपूर्ण रेठरे बुद्रुक परिसर दुमदुमून गेला होता.
गुलाल आणि जल्लोष विजयाची खात्री पटताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतषबाजी करत आपला आनंद व्यक्त केला. कारखान्याच्या सत्तेची सूत्रे पुन्हा एकदा भोसले गटाच्याच हाती राहणार असल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. या मोठ्या विजयामुळे सहकार क्षेत्रात भोसले गटाचा दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून, रेठरे बुद्रुकमध्ये विजयाचा महासोहळा साजरा होत आहे.
आधीचे वृत्त
सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या कराड तालुक्यातील रेठरे बुद्रूक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कल समोर येऊ लागला आहे. मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील ‘जयवंतराव भोसले सहकार पॅनेल’ने विरोधकांवर मोठी मात करत सरासरी ७५०० मतांची भरघोस आघाडी घेतली आहे .
या कारखान्यासाठी रविवारी (२१ जून) अत्यंत चुरशीने ८२.२६ टक्के मतदान झाले होते . मंगळवारी (२३ जून) सकाळी आठ वाजल्यापासून कराड येथील वखार महामंडळाच्या गोदामात निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली . मतमोजणीसाठी एकूण ७६ टेबल लावण्यात आले असून, ३५० कर्मचारी या प्रक्रियेत गुंतलेले आहेत.
भोसले विरुद्ध मोहिते संघर्ष
या निवडणुकीत सत्ताधारी भोसले गटाच्या ‘सहकार पॅनेल’समोर माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या ‘संस्थापक पॅनेल’चे मोठे आव्हान होते. मात्र, पहिल्या फेरीपासूनच भोसले गटाच्या उमेदवारांनी घेतलेली आघाडी पाहता, मतदारांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवरच विश्वास दाखवल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे, माजी अध्यक्ष इंद्रजित मोहिते यांनी निवडणुकीपूर्वीच भोसले गटाला पाठिंबा दिला होता, ज्याचा फायदा सत्ताधारी पॅनेलला झाल्याचे मानले जात आहे.
अधिकृतपणे पहिल्या फेरीचा पूर्ण निकाल जाहीर होण्याआधीच, सहकार पॅनेलच्या उमेदवारांची आघाडी पाहून भोसले गटाच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गुलालाची उधळण करत जोरदार जल्लोष सुरू केला. फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजीने कराड परिसर दुमदुमून गेला .
भोसले गटाने विजयाची हॅट्ट्रीक साधल्याचे ताज्या कलानुसार दिसून येत आहे.






