राज्यात 20 लाख टन ऊस शिल्लक : फडणवीस

राज्यात २० लाख मेट्रिक टन अतिरिक्त ऊस गाळपाविना शिल्लक असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आळशी शेतकरी म्हणून हिणवून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू नका, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टेंभूर्णी, ता. माढा येथे दिला.
रयत क्रांती संघटना आयोजित ‘जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा’ या राज्यव्यापी आंदोलनाच्या समारोपात ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आ. राहूल कुल, आ. राजाभाऊ राऊत, आ. समाधान आवताडे, आ. राम सातपुते, आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. गोपीचंद पडळकर, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, भाजपा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे, प्रा. सुहास पाटील, धौर्यशिल मोहिते, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष धनश्री खटके, माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, जलतज्ज्ञ अनिल पाटील, शिवाजी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजपच्या काळात नव्याने सुरू केलेल्या शेतकरी व सामान्यांच्या अनेक योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केल्या. यांच्या योजना म्हणजे केवळ एक रुपया टाकून हॕॅलो म्हणण्यायोग्य जुन्या टेलिफोनसारख्या असल्याची खरमरीत टीका फडणवीस यांनी केली. ते म्हणाले, १७५ हजार कोटी रुपये केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा खात्यावर आत्तापर्यंत जमा केले. जागतिक बँकेकडून आमच्या सरकारने शेतकऱ्यांच्या ८ योजनांसाठी ४ हजार कोटी रुपयांचे पॕॅकेज मिळवले होते. महाविकास आघाडी सरकारने यातील दोन वर्षांत १०० कोटी रुपयेसुद्धा खर्च केले नाहीत. काही तरी लाज असेल तर हे सरकार शेतकऱ्यांसाठी काही तरी करेल. शेतकऱ्यांचा प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आ. सदाभाऊ खोत व आ. गोपीचंद पडळकर यांनी ही जागर यात्रा काढली असल्याचे फडणवीस म्हणाले.