सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील पुण्यतिथी

आज सोमवार, एप्रिल २७, २०२६ युगाब्द : ५१२८
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर वैशाख ०७, शके १९४८
सूर्योदय : ०६:१३ सूर्यास्त : १८:५९
चंद्रोदय : १५:२९ चंद्रास्त : ०३:४९, एप्रिल २८
शक : १९४८
संवत्सर : पराभव
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : वैशाख
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : मोहिनी एकादशी – १८:१५ पर्यंत
नक्षत्र : पूर्वाफाल्गुनी – २१:१८ पर्यंत
योग : ध्रुव – २१:३६ पर्यंत
करण : विष्टि – १८:१५ पर्यंत
द्वितीय करण : बव – पूर्ण रात्रि पर्यंत
सूर्य राशि : मेष
चंद्र राशि : सिंह – ०३:३५, एप्रिल २८ पर्यंत
राहुकाल : ०७:४९ ते ०९:२५
गुलिक काल : १४:१२ ते १५:४८
यमगण्ड : ११:०० ते १२:३६
अभिजित मुहूर्त : १२:११ ते १३:०२
दुर्मुहूर्त : १३:०२ ते १३:५३
दुर्मुहूर्त : १५:३५ ते १६:२६
अमृत काल : १४:४१ ते १६:२०
वर्ज्य : ०४:५४, एप्रिल २८ ते ०६:३५, एप्रिल २८
सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील – त्यांनी लहान वयातच शेतीला सुरुवात केली. त्याकाळी शेतकऱ्यांच्या जमिनी कर्जबाजारीपणामुळे सावकारांच्या घशात गेल्यामुळे ते कंगाल बनले होते, हे नेमके हेरून त्यांनी व्हवहारबुद्धी, चातुर्य व काटकसरीने शेती केली. १९२३ मध्ये ‘लोणी बुद्रुक सहकारी पतपेढी’ ची स्थापना करून ते सार्वजनिक जीवनातील सहकारी क्षेत्राकडे वळले. त्यांनी जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे निर्माण केले, तसेच गावातील पाथरवट-वडार मंडळींना एकत्र आणून ‘मजूर सहकारी सोसायटी’ची स्थापना केली.
इंग्रज सरकारने मुंबई कौन्सिलमध्ये ‘तुकडे बंदी आणि तुकडे जोड’ हे विधेयक आणले, या विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे तुकडे सावकाऱ्यांच्या घशात जाऊन ते जमिनीला मुकणार होते. अशा वेळी इस्लामपूर येथे शाहू महाराजांनी घेतलेल्या शेतकरी परिषदेला विखे−पाटील नगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांसह गेले व तेथे हजारो शेतकऱ्यापुढे भाषण देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यातूनच त्यांच्या शेतकरी नेतृत्वाचा जन्म झाला.
प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली बेलापूर रोड (श्रीरामपूर) येथे १९४५ मध्ये पार पडलेल्या ‘द डेक्कन कॅनॉल्स बागायतदार परिषदेत विखे-पाटील’ यांनी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी पद्धतीने साखर कारखाना काढण्याचा ठराव मांडला.
या परिषदेचे अध्यक्ष डॉ. धनंजयराव गाडगीळ यांनी व उपस्थित शेतकऱ्यांनी या कारखान्याचे मुख्य प्रवर्तक म्हणूक विखे-पाटील यांच्यावरच जबाबदारी टाकली. त्यांनी ही जबाबदारी पार पाडण्यासाठी १९४५ ते १९५० या कालखंडात अतोनात कष्ट घेऊन, गावोगावी व दारोदारी भटकंती करून भागभांडवल जमविले, तसेच कारखान्याला शासनाकडून मंजूरी मिळविली. कारखान्याच्या उभारणीसाठी त्यांनी केलेल्या भटकंतीकरिता शेतकऱ्यांचा एकही पैसा खर्च केला नाही. ‘परान्न घेणार नाही’ अशी त्यांची प्रतिज्ञा होती, त्यामुळे आपली भाकरी ते नेहमी आपल्या कोटाच्या खिशात बाळगीत असत. विखे−पाटील यांची साखर कारखाना काढण्याची कल्पना त्यावेळी हास्यास्पद ठरविली गेली.
अशा सर्वस्वी प्रतिकूल परिस्थीतीला तोंड देत विखे-पाटील यांनी प्रवरानगर येथे शेतकऱ्यांच्या पहिल्या ‘प्रवरा सहकारी कारखान्या’ची ३१ डिसेंबर १९५० या दिवशी स्थापना केली आणि या कारखान्यातून साखर उत्पादन सुरू झाले. त्यावेळचे मुंबई राज्याचे वित्त व सहकार मंत्री वैकुंठभाई मेहता यांनी या कारखान्यास शासनाची मान्यता मिळवून देऊन सर्वतोपरीने सहकार्य केले. प्रवरानगराचा हा कारखाना आशिया खंडातील सहकारी तत्त्वावरील अग्रगण्य साखर कारखाना मानला जातो.
विखे−पाटील यांनी सहकार, कृषी, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रांत केलेल्या मौलिक कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना १९६१ मध्ये ‘पद्मश्री’ हा किताब दिला, तर पुणे विद्यापीठाने ‘डी. लिट्.’ (१९७८) व राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (१९७९) या पदव्या प्रदान केल्या. लोणी बुद्रुक येथे त्याचे निधन झाले.
• १९८०: पद्मश्री पुरस्कार सन्मानित सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट, १८९७)
अभिनेत्री, नृत्यांगना जोहरा सेहगल : उत्तर प्रदेशातील खानदानी मुसलमान कुटुंबातला जोहरा यांचा जन्म. हे घराणे ब्रिटिशांच्या आगमनानंतरही नोकझोक टिकवून राहिलेले. वाघिणीच्या दुधाचा स्वीकार करणारे आणि आचारविचारानेही तरक्कीपसंद. त्यामुळेच, शालेय शिक्षण पूर्ण होता-होता ‘लग्नापेक्षा करिअरच करेन म्हणते मी’ असे जोहरा म्हणाल्यावर काका, भाऊ यांच्याकडून पाठिंबाच मिळाला.
वयाच्या अठराव्या वर्षी त्या जर्मनीला नृत्य शिकायला गेल्या. तीन वर्षांनी भारतात परत आल्यावर, भारतीय नृत्यशैलींचा प्रसार जगभर करणारे प्रसिद्ध नर्तक उदय शंकर यांच्या नृत्यसंस्थेत त्या रुजू झाल्या. पुढील आठ वर्षांतील त्यांचे जगभ्रमण याच संस्थेमार्फत झाले आणि इथेच त्यांना जन्माचा जोडीदारही मिळाला.. कामेश्वर सेहगल.
लाहोरमध्ये स्थायिक होऊन या जोडप्याने स्वत:ची डान्स अकॅडमी सुरू केली. पण लवकरच फाळणीचे वातावरण सुरू झाले. हा देश की तो, याचा निर्णय घ्यावाच लागणार हे दिसू लागले, तेव्हा पतीसह त्या मुंबईला आल्या आणि इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा) या संस्थेचा सांस्कृतिक आधार त्यांना सहज मिळाला. इप्टा हीच १९४०-५० या काळात मुंबईतील सर्वाधिक मोठी सांस्कृतिक चळवळ होती. मुंबईतील बुजुर्ग, जानेमाने आणि नवोदित कलाकार मोठय़ा संख्येने इप्टाशी संबंधित. उदय शंकरांच्या तालमीत वाढलेल्या सेहगल नाटय़ऋषी इब्राहिम अल्काझी आणि पृथ्वीराज कपूर यांच्या सहकारी झाल्या आणि त्यांच्या नृत्यकौशल्याला अभिनयाचे पैलू पडू लागले.
जातिवंत कलाकाराला आपल्या कलेशिवाय बाकी साऱ्या गोष्टी शून्यवत वाटतात. त्यामुळेच, इप्टात चालून आलेल्या पदास नकार देऊन त्या पृथ्वीराज कपूर यांच्या ‘पृथ्वी थिएटर्स’मध्ये आल्या. १९४५ ते ५९ पर्यंत त्यांनी पृथ्वीराज कपूर यांच्यासह ‘दीवार’ ‘शाकुंतल’, ‘पठाण’, ‘गद्दार’, ‘आहुती’, ‘कलाकार’, ‘पैसा’, ‘किसान’ अशा नाटकांची निर्मिती केली. ‘पठाण’पासून नाटकात छोटय़ामोठय़ा भूमिकाही करायला सुरुवात केली. तब्बल १४ वर्षे त्यांनी पृथ्वीराज कपूर यांच्यासह काम केले. पतीच्या अपघाती निधनामुळे १९५९ साली जोहरा यांनी पृथ्वी थिएटरचा राजीनामा दिला आणि पुढच्याच वर्षी ही मातबर नाटय़संस्था बंद पडली.
जहाज बुडेलशी परिस्थिती असताना अंत:प्रवाह ओळखून जहाजाने नवा मार्ग शोधावा, तसे जोहरा यांनी पुढल्या दोन वर्षांत केले.. मुंबईऐवजी दिल्लीत राहून तेथील नाटय़संस्थेत काम आणि शंकर्स वीकलीमध्ये नृत्य समीक्षालेखन, अशी दुहेरी जबाबदारी जोहरा सांभाळू लागल्या. याच काळात तत्कालीन रशिया, पूर्व जर्मनी आणि झेकोस्लोव्हाकियाचा तीन महिन्यांचा दौरा करून, भारतीय नृत्य आणि नाटय़ाविषयी अनेक व्याख्याने त्यांनी दिली.
मग १९६२ मध्ये अभिनय अभ्यासक्रमासाठी त्यांना ब्रिटिश शिष्यवृत्ती मिळाली आणि लंडनमध्ये त्यांच्या आयुष्यातील तिसरे पर्व सुरू झाले. तब्बल दशकभरच्या लंडन-वास्तव्यात सुरुवातीला त्यांनी कारकुनी केली, काही काळ चहाचे हॉटेलही चालवले. पण १९६६ मध्ये ‘द लाँग डिस्टन्स डय़ुएल’ या बीबीसीवर सादर होणाऱ्या कार्यक्रमात भूमिका मिळाली. मग बीबीसीच्याच रुडयार्ड किपलिंगवरील मालिकेत आणि इतर नाटकांत कामे मिळत गेली. तरीही १९७४ साली त्या दिल्लीला परतल्या.
‘राष्ट्रीय लोकनृत्य पथका’चे काम केंद्र सरकारने त्यांच्यावर सोपवल्यामुळे, सर्व भारतीय भाषांतील लोकनृत्ये बसवून त्यांचे भारतभर प्रयोग जोहरा यांनी केले. पण लवकरच आणीबाणी लागू झाली आणि त्या एकाधिकारशाहीने या संस्थेचा बळी घेतला. इथे काही खरे नाही हे ओळखून त्या लंडनला परतल्या. १९८७ पर्यंत लंडनच्या रंगभूमीवरील तसेच बीबीसीवरील अनेक नाटकांत भूमिका केल्या. सर लॉरेन्स ऑलिव्हिए, दिग्दर्शक सर टायरॉन गथ्री, फिओना वॉकर, प्रिसिला मॉर्गन आणि जेम्स केरी या ब्रिटिश रंगभूमीवरील दीपस्तंभांबरोबर काम केले.
इप्टा, पृथ्वी थिएटर, लंडनमधील ओल्ड विक, द ब्रिटिश ड्रामा लीग, बीबीसी अशा चढत्या भाजणीच्या प्रवासात जोहरा यांची वाटचाल सुखकर झाली असे नाही. प्रत्येक वेळी विस्थापितासारखा त्यांना आपला गाशा गुंडाळून नव्या ठिकाणी स्वत:बरोबर आपल्या कलेचेही पुनर्वसन करावे लागले. पण त्या कधी हिंमत हरल्या नाहीत की त्यांनी आपली प्रतिभा आळसावू दिली नाही. मिळेल त्या मार्गाने त्या वाट काढत राहिल्या.
आठ वर्षे उदय शंकर, १४ वर्षे पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर आणि तब्बल २५ वर्षे लंडनमध्ये टीव्हीवर काम केल्यावर सेहगल . १९८७ साली भारतात परतल्या तेव्हा खरे तर अनेक संधींनी त्यांच्यापुढे हात जोडून उभे राहायला हवे होते. पण त्यांना हिंदी चित्रपटांतील छोटय़ा छोटय़ा भूमिका कराव्या लागल्या. तरीही त्यांनी उतारवयात १५ इंग्रजी नाटके, २६ चित्रपट आणि १४ टीव्ही मालिकांत काम केले. १९९३ ते २००५ या काळात काव्य-अभिवाचनाचे अनेक कार्यक्रम केले. जाहिरातींसाठीही विचारणा होऊ लागली आणि जोहरा नाही म्हणाल्या नाहीत.. अशाच एका जाहिरातीत विवेक ओबेरॉय त्यांचा हात हातात घेऊन म्हणतो, ‘ये मेरी जोहराजबी, तुझे मालूम नहीं..’
काम करण्याची अफाट ऊर्जा, ‘जाऊ तिथे तगून राहू’ ही महत्त्वाकांक्षा, यांच्या जोडीला जगण्यावरचे नितांत प्रेम या गोष्टींनी जोहरा सेहगल यांना कायम चिरतरुण ठेवले. त्यांना पडद्यावर पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असेच म्हणावेसे वाटत असणार. उत्फुल्ल रसिकता आणि सळसळते चैतन्य यांचे शतक साजरे करून, त्याहीवर दोन वर्षे जगून त्या गेल्या.. न फुटण्याचे वरदान कोणत्याही जहाजाला मिळालेले नसते, पण आपले जहाज कसे डौलात पुढे नेत राहायचे, हे समजावे लागते. त्यासाठी केवळ निर्णयशक्ती नव्हे तर तंत्रावरली हुकमत आणि कौशल्यही आवश्यकच असते. हे सारे जोहरा नावाच्या जहाजाकडे होते. त्यालाही काळाच्या समुद्राने कवेत घेतले.
जोहरा सेहगल यांना पदश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आदी सन्मानांनी गौरवण्यात आले होते.
१९१२: भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर जोहरा सेहगल यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै, २०१४)
- घटना :
१८५४: पुण्याहून मुंबईला तारायंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.
१९०८: चौथ्या ऑलिम्पिक खेळांना लंडन येथे सुरुवात झाली.
१९४१: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी अथेन्समधे प्रवेश केला.
१९६१: सिएरा लिओनला ग्रेट ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९७४: राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे १०,००० लोकांनी निदर्शने केली.
१९९२: बॅटी बूथरायड ह्या ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्सच्या लोकप्रतिनिधी निवडून येणारया पहिल्या महिला ठरल्या.
१९९९: एकाच अग्निबाणाद्वारे एकापेक्षा अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची प्रणाली भारतात तयार झाली.
२००५: एअरबस ए-३८० जातीच्या विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
२०११: अमेरिकेच्या दक्षिण भागात टोनँडोंचा उद्रेक त्यात ३०० ठार झाले.
• मृत्यू :
• १८९८: ज्योतिर्विद शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचे निधन. (जन्म: २१ जुलै, १८५३)
• १९९८: जलदगती गोलंदाज रमाकांत देसाई यांचे निधन. (जन्म: २० जून १९३९)
• २०१७: भारतीय अभिनेते सांस्कृतिक व पर्यटन मंत्री , परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री विनोद खन्ना यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर , १९४६)
- जन्म :
१८८३: नाटककार भार्गवराम विठ्ठल वरेरकर उर्फ मामा वरेरकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर , १९६४)
१९२०: महात्मा गांधींचे अनुयायी पदश्री डॉ. मणिभाई भीमभाई देसाई यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर, १९९३)
१९७६: पटकथालेखक भारतीय दिग्दर्शक फैसल सैफ यांचा जन्म.






