महाराष्ट्र सहकार विकास महामंडळला तिफण कृषी गौरव पुरस्कार

पुणे – महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाने कृषी क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेत, तिफण कृषी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (पुणे) ही कृषी विभागाची शेतकऱ्यांकरता प्रशिक्षण देणारी अधिकृत प्रशिक्षण संस्था आहे. राज्यातील विशेषतः विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये कृषी प्रशिक्षणाचे काम महामंडळाच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून अतिशय जोमाने सुरू आहे.
कृषी व्यवसाय वृद्धी कक्षाच्या माध्यमातून व्यवसाय प्रकल्प वित्त पुरवठा बाजार जोडणी व प्रशिक्षण यासारख्या सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून दिल्या आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना व बळकटीकरण तसेच आधुनिक तंत्रज्ञान व निर्यात संधीचा प्रसार करून कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली आहे. प्रशिक्षण अभ्यास दौरे व मार्गदर्शनाद्वारे शेतकऱ्यांना व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत केली आहे.
या ग्रामीण विकासाभिमुख व प्रभावी कार्याची दखल घेऊन तिफण कृषी गौरव २०२५ अंतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळास Special Recognition Award ( विशेष दखल पुरस्कार) कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त श्री. सूरज मांढरे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला.
महामंडळाच्या वतीने सदर पुरस्कार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे व प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप यांनी स्वीकारला. सदर कार्यक्रमास ॲग्रोवनचे संपादक रमेश जाधव ,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे , कृषी विभागाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक रफिक नाईकवाडी , पुणे जिल्ह्याचे विभागीय कृषी सहसंचालक श्री दत्तात्रय गावसाने ,तिफण फाउंडेशनचे संस्थापक सुखदेव जमदाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते..
तिफण फाउंडेशन ही कृषी विभागातील राज्यस्तरीय कर्मचारी वृंदाची प्रबळ संघटना असून कोरोना काळापासून विधायक,सामाजिक बांधिलकी जपणारी विविध पुणे कार्य या संघटनेमार्फत पार पाडली जात आहेत.






