भारताच्या ऊर्जा स्वयंपूर्णतेचा मार्ग साखर कारखान्यांतून

–दिलीप पाटील
सहअध्यक्ष, शुगर बायोएनर्जी फोरम, आयएफजीई. (९६३७७६४१११)
भारत आजही इंधनासाठी परदेशावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. दरवर्षी अब्जावधी डॉलर परकीय चलन तेल आणि गॅस आयातीवर खर्च होतो. हा पैसा देशातील पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास, शिक्षण किंवा शेतीसाठी वापरला जाऊ शकला असता. पण या समस्येचे उत्तर तेलविहिरीत नाही; ते महाराष्ट्राच्या ऊस पट्ट्यात आणि सहकारी साखर कारखान्यांत दडलेले आहे. ऊस हा फक्त साखरेचा स्रोत नाही, तर तो एक ऊर्जा पीक आहे, ज्यातून विविध प्रकारची जैवऊर्जा निर्माण होऊ शकते.
एकात्मिक बायो-रिफायनरी संकुले
पहिल्या कृषी क्रांतीने भारताला अन्नसुरक्षा दिली, दुसऱ्या औद्योगिक क्रांतीने शेतमालातून मूल्यवर्धन केले. आता भारताला तिसऱ्या क्रांतीची गरज आहे—ऊर्जा क्रांतीची. ही क्रांती म्हणजे जैवसंपत्तीपासून अधिक इंधन, वायू, वीज आणि रसायने निर्माण करणे. महाराष्ट्रातील सहकारी साखर उद्योग या क्रांतीचे केंद्रबिंदू ठरू शकतात. राज्यातील 200 पेक्षा अधिक कारखाने हे केवळ साखर बनवणारे उद्योग नाहीत; ते भविष्यातील एकात्मिक बायो-रिफायनरी संकुले बनू शकतात.
प्रत्येक गाळप हंगामात बगॅस, प्रेसमड, मळी, स्पेंटवॉश आणि उसाचा पाला निर्माण होतो. आज या उपउत्पादनांकडे ‘कचरा’ म्हणून पाहिले जाते; पण प्रत्यक्षात हीच जैवसंपत्ती ऊर्जा अर्थव्यवस्थेचा पाया ठरू शकते. बगॅस हे केवळ बॉयलरमधील इंधन नाही, तर प्रगत गॅसिफिकेशनद्वारे सिनगॅसमध्ये रूपांतरित होऊन ग्रीन मेथेनॉल, डायमिथाइल इथर आणि ग्रीन हायड्रोजनसारखी उच्च मूल्य उत्पादने देऊ शकते. प्रेसमड बायो-सीबीजी निर्मितीसाठी उपयुक्त असून त्यातून पोटॅशसारखे पोषकतत्त्व पुनर्प्राप्त करता येते. स्पेंटवॉश, जो पूर्वी प्रदूषणाचा प्रश्न मानला जात होता, आज बायोगॅसचा स्रोत बनला आहे. उसाचा पाला, जो मोठ्या प्रमाणावर जाळला जातो, तो 2G इथेनॉलसाठी महत्त्वाचा कच्चा माल आहे. मळी तर आधीपासूनच इथेनॉल क्रांतीची आधारशिला ठरली आहे.
ब्राझीलची ऊसावर आधारित इथेनॉल अर्थव्यवस्था
जगभरात बायो-रिफायनरी संकल्पना वेगाने पुढे जात आहे. ब्राझीलने ऊसावर आधारित इथेनॉल अर्थव्यवस्था उभी केली आहे, ज्यामुळे त्यांच्या इंधनात 30–40% इथेनॉल मिश्रण शक्य झाले. युरोपमध्ये बायोगॅस आणि बायो-सीबीजीला धोरणात्मक आधार मिळत आहे. अमेरिकेत ग्रीन हायड्रोजन आणि बायो-केमिकल्ससाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. महाराष्ट्रातील सहकारी कारखाने या जागतिक प्रवाहाशी जुळून घेऊ शकतात. उजनी-सोलापूर परिसरात येऊ घातलेला ग्रीन हायड्रोजन प्रकल्प हे याचे ठोस उदाहरण आहे, ज्यामुळे स्थानिक बायोमासवर आधारित ऊर्जा उत्पादन आता केवळ कल्पनेत राहिलेले नाही.
भविष्यातील साखर कारखाना हा फक्त साखर उत्पादक न राहता एकात्मिक बायो-रिफायनरी बनेल. एका संकुलातून साखर, इथेनॉल, बायो-सीबीजी, ग्रीन हायड्रोजन, वीज, बायोचार, कार्बन डायऑक्साइड आणि जैवखते निर्माण होतील. यामुळे कारखाने ऊर्जा, कार्बन आणि रसायन अर्थव्यवस्थेचा भाग बनतील. जिल्हास्तरीय ऊर्जा स्वयंपूर्णतेची संकल्पना यातून पुढे येते. मध्यम आकाराच्या कारखान्याच्या जिल्ह्यात वीज, इथेनॉल, मिथेनॅाल, हायड्रोजन, कार्बन डाय ऑक्साइड, डीएमई ( एलपीजीत मिसळण्यासाठी) बायो-सीबीजी आणि बायोचार तयार होऊ शकते. त्यामुळे बाहेरून विकत घेतल्या जाणाऱ्या डिझेल, एलपीजी आणि सीएनजीचा काही हिस्सा स्थानिक उत्पादनाने बदलता येईल.
सहकारी मॉडेल
या परिवर्तनासाठी सहकारी मॉडेल वापरले तर ऊर्जा उत्पन्नाचा लाभ थेट ग्रामीण अर्थव्यवस्थेतच राहतो. बायो-सीबीजी, हायड्रोजन किंवा कार्बन क्रेडिट्समधून मिळणारे उत्पन्न शेतकऱ्यांना थेट फायदा देऊ शकते. ही केवळ ऊर्जा क्रांती नसेल; ही ग्रामीण संपत्ती निर्मितीची नवी चळवळ ठरेल.
या संकल्पनेला यशस्वी करण्यासाठी काही मूलभूत पावले आवश्यक आहेत. पहिले म्हणजे बगॅस व जैव-अवशेषांना उच्च मूल्य फीडस्टॉक म्हणून स्वीकारणे. दुसरे म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा ऊर्जा ताळेबंद तयार करणे. तिसरे म्हणजे साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती मजबूत करून हरित ऊर्जा गुंतवणुकीसाठी सक्षम करणे. चौथे म्हणजे बायो-रिफायनरी उत्पादनांना खात्रीशीर बाजारपेठ आणि धोरणात्मक आधार देणे. पाचवे म्हणजे उजनीमध्ये येत असलेल्या परकीय गुंतवणूक प्रकल्प इतर कारखान्यांत राबवणे. सहावे म्हणजे ग्रामीण भागात हरित ऊर्जा कौशल्य विकास घडवणे. आणि सातवे म्हणजे बायोचार व जैवखतेद्वारे मृदा आरोग्य सुधारून निसर्गचक्र पूर्ण करणे.
भारताची ऊर्जा स्वयंपूर्णतेची रचना मोठ्या शहरांत नाही, तर महाराष्ट्राच्या ऊस शेतात आहे. खरी क्रांती नवीन साधनांनी नव्हे, तर आधीपासून असलेल्या साधनांकडे नव्या दृष्टीने पाहिल्यावर घडते. महाराष्ट्राकडे ती दृष्टी घडवण्याची क्षमता आहे, आणि सहकारी कारखाने या परिवर्तनाचे जनक ठरू शकतात. एकेकाळी सहकारी साखर कारखान्यांनी ग्रामीण महाराष्ट्रात रस्ते, शिक्षणसंस्था, दवाखाने आणि सामाजिक परिवर्तन घडवले. त्यांनी पहिल्या दोन क्रांतींमध्ये मोलाची भूमिका बजावली. आता ते तिसऱ्या क्रांतीचे ऊर्जा क्रांतीचे जनक होऊ शकतात.





