एकरी 175 टन ऊस उत्पादन शक्य : डॉ. जमदग्नी

सांगली : योग्यवेळी योग्य निर्णय, काटेकोर नियोजन, एकरी मर्यादित ऊस संख्या आदींबाबत काळजी घेतल्यास एकरी पावणेदोनशे ते दोनशे टनापर्यंत ऊस उत्पादन शक्य आहे, असे प्रतिपादन प्रख्यात ऊसतज्ज्ञ तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठातील निवृत्त प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण महादेव जमदग्नी यांनी केले.
सांगली येथे ‘पुढारी’ च्या वतीने आयोजित अॅग्रीपंढरी कार्यक्रमात ते बोलत होते. कसबे डिग्रज कृषी संशोधन केंद्रातील पीकतज्ज्ञ डॉ. एम. पी. देशमुख अध्यक्षस्थानी होते.
डॉ. जमदग्नी यांनी यावेळी उसासाठीच्या शेताची पूर्वमशागतीपासून ते अगदी संजीवक फवारणीपर्यंत सर्व माहिती दिली.
अत्यंत सहज सुलभ भाषेत डॉ. जमदग्नी यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले, सर्वात आधी उसासाठीचे क्षेत्र निश्चित करा. चार एकर शेती असेल तर एक एकर खोडवा, एक एकर लागण आणि एक एकर जाणारा ऊस ठेवा तर चौथा एकर पीक फेरपालटाची पिके घेण्यासाठी मोकळे ठेवा. मार्च एप्रिलमध्ये नांगरट करा, रान चांगले तापू द्या, नंतर सरी सोडा.
सरीवर पुन्हा रान महिना सव्वा महिना तापू द्या. नंतर ताग करा, तो फुलोर्यात असताना गाडा. नंतर विपुलची फवारणी करा. नंतर एकरी सोयीने आठ ते दहा टन शेणखत वापरा. सरी सोडताना पाच फुटीच सोडा. गाडलेला ताग कुजण्यासाठी यानंतर जीवाणू खतांचा वापर करा.
ते म्हणाले, उसाचे एकरी उच्चांकी उत्पादन मिळवण्यासाठी वाण आणि बियाणाची निवड ही अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाची ठरते. यासाठी को-86032, को- 265, को- 10001, को- 8005 आदी विविध वाणांपैकी एखाद्या वाणाची निवड करावी.
तसेच एक डोळा, दोन डोळी लावण करण्यापेक्षा तयार रोपांची लावण करा. यासाठी देखील तुलनेने स्वस्त ठरणारा सुपर केन नर्सरीचा पर्याय चांगला ठरतो. याचा शेतकर्यांनी अवश्य विचार करावा. ते म्हणाले, ऊस लागणीनंतर रोपांची संख्या, फुटवा यांची संख्या याकडे बारकाईने नजर ठेवा. फुटव्यांची संख्या मर्यादित राहील याकडे लक्ष द्या. नंतर उसाची चांगली जोमदार, ताकदीने वाढ होण्यासाठी वेळोवेळी तणनाशक, संप्रेरक तसेच संजीवकांच्या फवारण्या योग्य वेळेत करा.
तसेच बाळभरणीपासून ते पक्की बांधणी करेपर्यंत खतांची मात्रा शेतीची आणि पिकाची गरज ओळखून योग्य प्रमाणात द्या. तसेच उसाला पाण्याचे नियोजन करताना शक्यतो ठिबकचा वापर करा. तसेच पाटपाणी असेल तर किमान 14 – 15 दिवसांतून पाण्याची पाळी बसेल असे नियोजन करा.