‘सोमेश्वर’च्या निवडणुकीत रंगणार राजकीय सामना!

बारामती: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर विविध राजकीय गटांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, कार्यकर्त्यांच्या बैठका आणि संपर्क दौऱ्यांना वेग आला आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत सोमेश्वर येथे शेतकरी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात आगामी निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर चर्चा झाल्याचे दिसून आले.
सोमेश्वर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील गावागावांत राजकीय बैठका घेण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून सभासदांशी संपर्क साधण्यावरही भर दिला जात आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत भाजपविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत झाली होती. त्यावेळी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलचा एकतर्फी विजय झाला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडींमुळे आगामी निवडणुकीत नव्या राजकीय समीकरणांची शक्यता व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, स्थानिक पातळीवरील बदललेली राजकीय परिस्थिती आणि विविध गटांची भूमिका यामुळे निवडणुकीत चुरस वाढण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांमध्ये संभाव्य संघर्षाची चर्चा सुरू असून, विरोधकांकडूनही मोर्चेबांधणी केली जात आहे.
दरम्यान, कारखान्याच्या आर्थिक स्थितीबरोबरच गाळप क्षमता, सभासदांचे प्रश्न आणि आगामी निवडणुकीतील नेतृत्व हे मुद्देही महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याची निवडणूक केवळ सहकारी संस्थेची निवडणूक न राहता, बारामतीतील राजकीय शक्तिप्रदर्शनाचे केंद्र ठरण्याची शक्यता आहे.





