ऊस पिक संरक्षणासाठी आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर

अहिल्यानगर : जिल्ह्यात ऊस शेतकऱ्यांसाठी एक नवे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखाना व जनसेवा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ही संयुक्त मोहीम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाअंतर्गत पारंपरिक पद्धतीत जास्त मजुरी व वेळ लागत असताना, ड्रोन तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणावर ऊस पिकाचे संरक्षण सहज शक्य होणार आहे.
अल्प पावसामुळे ऊस पिकावर पांढरा लोकरी मावा, तपकिरी ठिपका तसेच पायरी यांसारख्या रोग-किडींचा प्रादुर्भावाचे वेळीच नियंत्रण या मोहिमेदरम्यान करता येणार आहे. या उपक्रमामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.
कारखान्याच्या ऊस विकास विभागामार्फत शेतकऱ्यांना रोग-किडींच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शन करण्याबरोबरच आवश्यक औषधांचा अल्प दरात पुरवठा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कारखान्याच्या दाढ प्रक्षेत्रावर जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिक पार पडले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सोपान शिरसाठ, संचालक ज्ञानेश्वर खर्डे, शेतकी अधिकारी संतोष एलम, नकुल कटारे, दिग्विजय देशमुख, जनसेवा फाउंडेशन प्रकल्प अधिकारी रुपाली लोंढे, निलेश गागरे व ड्रोन दीदी यांच्यासह कृषी अधिकारी, कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
ड्रोनच्या माध्यमातून फवारणी केल्यामुळे कमी कालावधीत मोठ्या क्षेत्रावर औषध फवारणी करता येते. विशेषतः मोठ्या ऊस क्षेत्रामध्ये मजूर, वेळ व श्रमाची बचत होण्यास मदत होते. यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, ऊस पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष सोपान शिरसाट यांनी केले.





