‘राजाराम’च्या अध्यक्षपदी अमल महाडिक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अमल महाडिक यांची, तर उपाध्यक्षपदी नारायणराव चव्हाण यांची एकमताने निवड झाली.
नूतन संचालक मंडळाची बैठक मंगळवारी झाली आणि अमल महाडिक यांच्या नावाचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक राज्यात चांगलीच गाजली. माजी आमदार महादेवराव महाडिक विरुद्ध माजी गृहराज्यमंत्री काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यात लढत रंगली होती.
या निवडणुकीत महादेवराव महाडिक पॅनलने सतेज पाटील यांच्या पॅनलचा पराभव करत विजय मिळवला. मंगळवारी (९ मे) या साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालकांची पहिली बैठक झाली. या बैठकीत अध्यक्षपदी माजी आमदार अमल महाडिक तर उपाध्यक्षपदी चव्हाण यांची निवड करण्यात आली.
कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांनी अपप्रचार केला. त्याला सभासद मतदारांनी निकालाद्वारे उत्तर दिले आहे. माझी चेअरमनपदी निवड झाली असली, तरी निवडून आलेले २० सभासद असे सर्वजण आम्ही चेअरमन म्हणून काम करणार आहोत. निवडणुकीच्या वचननाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील, अशी ग्वाही नूतन चेअरमन अमल महाडिक यांनी दिली.

राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलने विकासात्मक बाबी मांडल्या. मात्र विरोधकांनी टीकात्मक बाबी मांडत अपप्रचार केला. यामुळे सभासद शेतकऱ्यांनी विकासाला आणि सत्याला कौल दिला, असे म्हणत खासदार धनंजय महाडिक यांनी नाव न घेता आमदार सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला.

निवडणुकीत अपप्रचार आणि वैयक्तिक चारित्र्यहनन विरोधकांनी केले. त्यास मतदारांनी मतदानातून उत्तर दिले. विरोधकांनी अमल महाडिक यांना २६ प्रश्न विचारले होते. महाडिक यांनी त्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. परंतु अमल महाडिक यांनी विरोधकांना विचारलेल्या ५ प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत. ती त्यांनी द्यावीत, अशी मागणीही खा. धनंजय महाडिक यांनी केली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »