ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठा निर्णय

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, यावल, चाळीसगावमध्ये शासकीय वसतिगृहे सुरू
जळगाव : ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी मोठा दिलासा. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील एरंडोल, यावल आणि चाळीसगाव येथे ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी स्वतंत्र भाडेतत्त्वावरील शासकीय वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या 3 ठिकाणी प्रत्येकी 100 विद्यार्थी व विद्यार्थिनींची क्षमता असलेली वसतिगृहे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्यासाठी समाज कल्याण विभागातर्फे तातडीने भाडेतत्त्वावर इमारती शोधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
वसतिगृहांसाठी अटी-शर्ती
प्रत्येक वसतिगृहासाठी सुमारे 1200 चौरस फूट जागा असलेली तळमजल्यावरील इमारत हवी. जागा शहराच्या मध्यवर्ती भागात, महाविद्यालय व शाळांजवळ असावी. तसेच आवश्यक सोयी-सुविधांनी युक्त असावी.इच्छुक मालकांनी प्रस्ताव समाज कल्याणचे सहायक आयुक्त यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे. प्रस्ताव देताना शासनाने निश्चित केलेल्या सर्व अटी व शर्तींचे पालन करून इमारत भाडेतत्त्वावर देण्यास तयार असल्याचे स्पष्ट करणे बंधनकारक आहे.





