शेतकरी-कामगारांच्या साथीने ‘किसन वीर’ला उभारी : मकरंद पाटील

पाचवड : किसन वीर आणि खंडाळा साखर कारखान्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढून पुन्हा उभे करण्यात सभासद शेतकरी आणि कामगारांचे मोलाचे योगदान आहे. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच दोन्ही कारखान्यांची वाटचाल सुरू राहिली, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री व कारखान्याचे चेअरमन मकरंदआबा पाटील यांनी केले.
किसन वीर साखर कारखान्याच्या २०२६–२७ गळीत हंगामाच्या डिस्टिलरी बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते अग्निप्रदीपन करण्यात आले. यावेळी खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष वैभव शिंदे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, बाळासाहेब कदम आणि दत्तात्रय ढमाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, दोन्ही कारखाने ताब्यात घेतले तेव्हा आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. प्रचंड कर्ज आणि नव्याने कर्ज मिळण्यातील अडचणी असतानाही सभासद शेतकऱ्यांनी साथ दिली. कामगारांनीही जबाबदारीने काम केले. त्यामुळे मागील गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण करून कमी दिवसांत क्षमतेपेक्षा अधिक ऊस गाळप करणे शक्य झाले.
सभासद शेतकऱ्यांनी भागभांडवलाच्या माध्यमातून दिलेली मदत कारखाने सुरू करण्यासाठी महत्त्वाची ठरल्याचे त्यांनी सांगितले. कर्जाच्या उपलब्धतेमुळे आर्थिक अडचणी दूर करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले असून, विनाकर्ज थकीत बिलांबाबतही संचालक मंडळ उपाययोजना करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दोन्ही कारखान्यांनी यंदा पूर्ण क्षमतेने गाळप करावे, असे आवाहन पाटील यांनी केले. किसन वीर कारखान्यासाठी सात लाख, तर खंडाळा कारखान्यासाठी चार लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सभासदांची दिवाळी होणार गोड
आजी व माजी सभासदांपैकी कारखान्याला ऊस पुरविणाऱ्यांना १० किलो, तर ऊस न पुरविणाऱ्या सभासदांना पाच किलो साखर देण्याची घोषणा पाटील यांनी केली. या घोषणेचे उपस्थित सभासदांनी स्वागत केले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डिस्टिलरी तसेच अन्य बॉयलरचे पूजन करण्यात आले. यावेळी दोन्ही कारखान्यांचे संचालक, सभासद शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.






