दिवाळीसाठी ‘विठ्ठल’कडून ऊस बिलाचा १०० रुपयांचा हप्ता

पंढरपूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना दिवाळीसाठी ऊस बिलाचा प्रतिटन १०० रुपयांचा हप्ता देण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजीत पाटील यांनी दिली. कारखान्याच्या ७१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
पाटील म्हणाले की, कारखान्याने मागील चार वर्षांत उसाला एफआरपीपेक्षा जादा दर दिला आहे. सन २०२४-२५ मध्ये गाळपासाठी आलेल्या उसाला प्रतिटन ३,५०० रुपये दर देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यापैकी ३,००३ रुपये यापूर्वी अदा केले आहेत. उर्वरित रकमेतून १०० रुपयांचा हप्ता दिवाळीसाठी दिला जाईल; बाकी रक्कम टप्प्याटप्प्याने अदा करण्यात येईल.
यावेळी सन २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी बॉयलर अग्निप्रदीपन समारंभही झाला. कारखान्याच्या आधुनिकीकरणासाठी सुमारे ८० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच दिवाळीनिमित्त कामगारांना एक महिन्याच्या पगाराएवढा बोनस देण्याचा निर्णय झाल्याची माहिती त्यांनी दिली.






