साखरेची एमएसपी वाढवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार : धनंजय महाडिक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मोहोळ : साखरेची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ४५ रुपये प्रतिकिलो करावी आणि उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला ९२ रुपये प्रतिलिटर दर द्यावा, अशी मागणी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्याकडे करणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या ५१ व्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

महाडिक म्हणाले की, साखरेची आधारभूत किंमत २०१७ पासून तशीच आहे; मात्र शेतकऱ्यांच्या उसाची रास्त व किफायतशीर किंमत (एफआरपी) दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे कारखान्यांसमोर उसाला दर देण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

मागील गळीत हंगामात ऊस पुरवलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीसाठी ८६०३२ वाणाच्या उसावर प्रतिटन २०० रुपये, तर इतर वाणांवर प्रतिटन १०० रुपये देण्यात येतील, अशी घोषणाही त्यांनी केली. सलग तीन वर्षे ऊस पुरवलेल्या सभासदांना २५ किलो साखर मोफत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भीमा कारखाना खासगी झाल्याच्या चर्चांना उत्तर देताना महाडिक म्हणाले की, कारखाना मल्टिस्टेट करण्यात आला आहे; तो खासगी झालेला नाही. सभासदांनी अफवांवर विश्वास न ठेवता कारखान्याला ऊस पुरवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »