१५ ऑक्टोबरपूर्वी ऊस गाळप सुरू करण्यास परवानगी; अधिकृत परवाना बंधनकारक

पुणे : राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांना २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२६ पूर्वीही सुरू करता येणार आहे. मात्र, त्यासाठी साखर आयुक्त कार्यालयाचा अधिकृत गाळप परवाना घेणे बंधनकारक असल्याची माहिती साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार कारखान्यांना हंगाम लवकर सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. आवश्यक कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केलेले कारखाने १५ ऑक्टोबरची प्रतीक्षा न करता गाळप सुरू करू शकतात.
मुदतीपूर्वी गाळप सुरू करू इच्छिणाऱ्या कारखान्यांनी परवान्यासाठी अर्ज करावा. हंगाम लवकर सुरू करण्याची मुभा म्हणजे परवान्याशिवाय गाळप करण्याची परवानगी नव्हे, असे डॉ. कोलते यांनी स्पष्ट केले. कारखान्यांनी अधिकृत परवाना मिळाल्यानंतरच गाळप सुरू करावे, असे आवाहन साखर आयुक्तालयाने केले आहे.






