सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऊस बिलाची प्रतीक्षाच

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सोलापूर : हंगामाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना ऊसबिले दिली; परंतु, हंगामाच्या शेवटी गाळप झालेल्या उसाची बिले संपूर्ण न देता कमी अधिक करून दिली आहेत. त्यामुळे आता उर्वरित ऊसबिलासाठी कारखान्यांचे उंबरठे झिजविण्याची वेळ ऊस उत्पादित शेतकऱ्यांवर आली आहे.  ऊसदर जाहीर केल्याप्रमाणे तो दर देण्यास काही कारखाने टाळाटाळ करीत आहेत. साखर हंगाम संपून साडेतीन महिन्यांचा कालावधी लोटला तरीही जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे त्यांनी हंगामाच्या प्रारंभी जाहीर केलेल्या दराप्रमाणे किंवा दिलेल्या पहिल्या हप्त्यानुसार एप्रिलअखेर शेतकऱ्यांची तब्बल ४२५ कोटी रुपयांची ऊसबिले अजूनही अडकली आहेत.

एफआरपी अहवालानुसार जिल्ह्यातील १४ कारखान्यांनी शंभर टक्के ऊसबिले दिले. अहवालानुसार १९ कारखान्यांकडे २१५ कोटी रुपये एफआरपी थकीत असल्याचे आकडेवारी सांगते. मात्र, प्रत्यक्षात २७ कारखान्यांकडे त्यांनी जाहीर केलेल्या ऊसदराप्रमाणे ४२५ कोटी रुपयांची ऊसबिले अद्यापही थकीत आहेत. केवळ सहा कारखान्यांनीच त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे ऊसबिले दिली असल्याचे दिसते.

जिल्ह्यात यंदा ३३ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. त्यामध्ये एक कोटी चार लाख चार हजार ७६ मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन ८८ लाख २८ हजार ७७६ क्विंटल साखर तयार झाली. गाळप झालेल्या उसाचे दोन हजार ४९७ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. ऊस मिळविण्यासाठी अनेक कारखान्यांनी हंगाम सुरू होताना २७०० ते ३५०० रुपयांपर्यंत ऊसदर जाहीर केला होता. तथापि, बहुतांश कारखान्यांची प्रतिटन एफआरपी त्यांनी दिलेल्या पहिल्या हप्त्यानुसार किंवा जाहीर केलेल्या दरापेक्षा कमी असल्याचे साखर आयुक्तालयाकडील अहवालावरून दिसते.

आरआरसी कारवाई करून साखर आयुक्त एफआरपीच्या जबाबदारीतून बाहेर पडत आहेत.  राज्यात यावर्षी २० कारखान्यांवर आरआरसी कारवाई झाली. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यांचा समावेश आहे. मातोश्री, गोकूळ शुगर्स, लोकमंगल (बीबीदारफळ व भंडारकवठे), जयहिंद, संत दामाजी, सिद्धनाथ, इंद्रेश्वर, धाराशिव (सांगोला) या कारखान्यांवर मार्चमध्ये तर सहकार शिरोमणी, सिद्धेश्वर, आवताडे शुगर्स या कारखान्यांवर एप्रिलमध्ये आरआरसी झाली आहे. पण ही कारवाई निव्वळ फार्स ठरल्याचे दिसते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »