शर्करायन – मंगेश तिटकारे

आवडल्यास ही बातमी शेअर करा
Mangesh Titkare

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे माजी एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी आणि साखर क्षेत्रावरील अनेक पुस्तकांचे लेखक श्री. मंगेश तिटकारे लिहिताहेत ‘शर्करायन’ या वाचकप्रिय सदरातून. या सदरात ते लिहिताहेत, साखर उद्योगाचा मानवी स्थलांतरावरील प्रभाव… भारताच्या संदर्भाने ही मालिका असेल, ती नक्कीच सर्वांना आवडेल –

संपादक (भाग ४)

भारताच्या बरोबर खाली, पण पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूला, दक्षिण अमेरिकेतील एका कोपऱ्यातील गयाना आणि आसपासच्या देशातील रेडिओ गार्डनवर तुम्ही कधी बटन दाबलं आणि तिथले रेडिओ ट्युन्स ऐकायचे प्रयत्न केले तर तुम्हाला आजही तेथील रेडिओ मधून स्वर्गीय लतादीदींच्या “हवा मे उडता जाये, मेरा लाल दुपट्टा मलमल का..” या गाण्याप्रमाणेच तलत जी, किशोरदा रफीसाहब यांची गाणी ऐकायला मिळतील.. हिंदी गाण्यांची सुंदर बरसात ऐकायला मिळेल.

त्यामुळं तुम्हाला आश्चर्य वाटेल. पृथ्वीच्या गोलावर, भारताच्या बरोबर खाली असलेल्या दक्षिण अमेरिकेतील या देशात भारतीय संस्कृती गेले १८५ वर्ष नांदते आहे आणि आजची गयानाची पिढीदेखील भारतीय संस्कृतीशी नाळ जोडून आहे.. संस्कृती, खाद्य संस्कृती आणि क्रिकेटच्या माध्यमातून….. फक्त आपल्याला त्याबद्दल फारशी माहिती नाही.

हे सर्व घडलं, दक्षिण अमेरिकेतील ब्रिटिश गयाना या देशातील ऊस मळ्यावर.. साखर कारखान्यात काम करण्यासाठी नेण्यात आलेल्या भारतीय करारबद्ध मजुरांमुळे… सन १८३० च्या दशकात ग्रेट ब्रिटनने आफ्रिकेतून आणलेल्या मजुरांच्या गुलामगिरीवर बंदी घालण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे ब्रिटिश वेस्ट इंडीज मध्ये भारतीयांचे स्थलांतर सुरू झाले. नुकत्याच मुक्त झालेल्या आफ्रिकन लोकांना जगण्यायोग्य वेतन हवे होते आणि ते ब्रिटिशांना मान्य नव्हते. यामुळे ऊस मळ्यांच्या मालकांनी कामगारांसाठी इतरत्र शोध सुरू केला. इतर देशातून भरती केल्यानंतर वसाहती मधील भरती ब्रिटिश हिंदुस्थानाकडे वळली.

ब्रिटिश गयानामध्ये गुलामगिरीच्या जागी करारबद्ध मजुरीची पद्धत आली. ७५ वर्षे टिकलेल्या या करारबद्ध गुलामगिरीच्या पद्धतीमध्ये अनेक अन्यायकारक बाबी होत्या, ज्यामुळे भारतीय राष्ट्रवाद्यांशी संघर्ष निर्माण झाला. त्यांनी १९१७ साला मध्ये ही पद्धत संपुष्टात आणण्यासाठी जोर दिला. गुलामगिरी आणि करारबद्ध स्थलांतरितांच्या अनुभवातील एक मोठा फरक हा होता की भारतातील करारबद्ध मजुरांनी स्थलांतरास सहमती दर्शवली होती आणि

पाच वर्षासाठी एका मळ्याशी बांधल्या जाण्यासाठी करारांवर स्वाक्षरी केली होती. जिथे त्यांना एक लहान व निश्चित असे दैनंदिन वेतन मिळत असे.

इंडियन अरायव्हल डे

पाच वर्षे काम केल्यानंतर, एकूण दहा वर्षे कालावधीनंतर जे वाचतील त्यांना उत्तर भारतात परत जाण्यासाठी तिकीट मिळण्याचा किंवा मळ्यामध्ये राहून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी जमीन आणि पैसे मिळण्याचा हक्क होता. ५ मे रोजी गयानामध्ये “इंडियन अरायव्हल डे” साजरा केला जातो. ५ मे १८३८ रोजी भारतातून व्हिटबाय जहाजात सुमारे ३९६ भारतीय स्थलांतरित कलकत्ता (आजचे कोलकाता) बंदरावरून गयाना मध्ये आले.

देशात आलेल्या पहिल्या करारबद्ध मजुरांच्या आगमनाची आठवण म्हणून पाच मे रोजी दरवर्षी ‘इंडियन अरायव्हल डे’ साजरा केला जातो. या दिवशी हे कामगार ब्रिटिशांच्या मालकीच्या उसाच्या मळ्यावर, साखर उत्पादनाचे काम करण्यासाठी आले होते. त्यानंतरच्या ८० वर्षांमध्ये म्हणजे १९१७ सालापर्यंत हिंदुस्थानातून एकूण ५०० हून अधिक जहाजांच्या सफरीमधून एकूण २,३८,९०९ पेक्षा जास्त करारबद्ध मजूर हिंदुस्थानातून गयानामध्ये आणल्याची नोंद आहे, त्यातील सुमारे ७५८९८ जण किंवा त्यांची मुले भारतीय उपखंडात परत गेल्याची नोंद आहे. पहिल्या पंचवीस वर्षांसाठी करारबद्ध मजूर प्रामुख्याने कलकत्ता आणि आसपासच्या लहान शहरांमधून घेतले जात होते, त्यानंतर श्रीलंकेसारख्या दूरच्या ठिकाणावरूनही लोकांची भरती केली जात होती.

सर्व भरती मोहिमांचा कणा

उत्तर अमेरिकेतील वेठबिगारांप्रमाणे व्यावसायिक भरती करणारे लोक होते. यांना उत्तर भारतात ‘अर्काटी’ आणि दक्षिण भारतात ‘मैस्त्री’ नावाचे पगारी स्थानिक एजंट मदत करत असत. धाक दाखवणे, फसवणूक, जबरदस्ती या बाबी सामान्य होत्या. तसेच अपहरण आणि सक्तीची नजर कैद सारख्या बेकायदेशीर प्रथाही काही प्रमाणात प्रचलित होत्या. स्वातंत्र्याचा अभाव, तीव्र उष्णता आणि क्रूर कामाच्या परिस्थितीला तोंड देण्या व्यतिरिक्त या करारबद्ध मजुरांना नव्याने स्वतंत्र झालेल्या आफ्रिकन लोकांकडूनही चांगली वागणूक मिळत नव्हती.

हिंदुस्थानातून स्थलांतरितांना दिल्या जाणाऱ्या अत्यंत कमी वेतनामुळे त्यांची उपजीविका कशीबशी होत होती. मळ्यांमधील भारतीय कामगारांना मनुष्य भेद आणि

वर्णभेदाचाही सामना सुरुवातीच्या काळात करावा लागला. त्यांना कठीण काळाला सामोरे जावे लागले. संरक्षणासाठी असलेले वसाहतवादी अधिकारी सहसा श्वेतवर्णीय मळे मालक वर्गाशी हितसंबंध ठेवून होते. भाषेच्या अडथळ्यांमुळे करारबद्ध कामगारांना त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांची तक्रार करणे देखील अवघड होते.

असे झाले होते स्थलांतर

हिंदीची सर्वाधिक बोलली जाणारी बोलीभाषा भोजपुरी, जी पूर्व उत्तर प्रदेश आणि पश्चिम बिहारमध्ये बोलली जाते त्या खालोखाल अवधी ही मध्य उत्तर प्रदेशात बोलली जाणारी भाषा होती. ६२% स्थलांतरित आताच्या उत्तर प्रदेश राज्याचा भाग असलेल्या जिल्ह्यांमधून आले होते, २० % बिहार मधून, ६ % फाळणी पूर्व बंगालमधून १ % हरियाणा आणि पंजाब मधून आणि २ % छोटा नागपूर आणि आसपासच्या भागातून मुख्यतः झारखंड आणि ओडिशा मधून आले होते. १% मध्य भारतातून, १% राजस्थान मधून, २% भारताच्या इतर भागातून, ५% मद्रास प्रेसिडेन्सी मधून आले होते. सर्व स्थलांतरितांपैकी ९५% लोक कलकत्ता बंदरातून आणि ५% मद्रास बंदरातून गयाना मध्ये गेले.

भारतीय स्थलांतरित पासवरील नावे आणि माहितीनुसार गयानामध्ये आलेल्या भारतीय स्थलांतरितांपैकी ८५% हिंदू धर्माचे पालन करणारे, १५% मुस्लिम धर्माचे पालन करणारे होते. हिंदुस्थानातील स्थलांतरितांनी गेल्या १८५ वर्षांमध्ये गयानावरती हिंदुस्तानी संस्कृतीचा चिरकालीन सांस्कृतिक ठसा उमटवला आहे. त्यांचे श्रमाचे करार संपताच त्यांनी मूळ व्यवसाय पुन्हा सुरू केले आणि आपल्या दत्तक घेतलेल्या मायभूमीत जवळजवळ वैशिष्ट्यपूर्ण पारंपरिक भारतीय गाव जीवनशैलीची पुनर्रचना केली.

गुलामगिरीतून मुक्त झाल्यावर प्रामुख्याने शहरी भागामध्ये स्थलांतरित झालेल्या आफ्रिकन मजुरांपेक्षा इंडो- गयानीज लोकांनी करारबद्ध मजुरी संपल्यानंतरही शेतीशी संबंध टिकवून ठेवले. १९१७ सालामध्ये जेव्हा करारबद्ध मजुरीची पद्धत रद्द करण्यात आली तेव्हा जवळजवळ सर्व इंडो गयानीज लोक उसाच्या मळ्यात रहात होते किंवा साखर उत्पादन उद्योगात काम करत होते.

१९३९ मध्ये एकूण भारतीय शेतमजुरांमध्ये महिलांचे प्रमाण ३१.३९% होते. अन्न बनवणे, मुलांची काळजी घेणे इत्यादी घरगुती कामे देखील त्यांच्याकडून अपेक्षित होती. महिलांनी दुकानदार, दूध विक्री किंवा पारंपरिक भारतीय खाद्यपदार्थांच्या विक्रेत्या जे अजूनही गयानाच्या खाद्य संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी पूरक कामे स्वीकारली…. कामे पूर्ण करून हिंदुस्थानात परतणाऱ्या भारतीय स्थलांतरितांना त्यांच्या समाजात पुन्हा सामावून घेताना अडचणीचा सामना करावा लागत होता.. परतणाऱ्यांसाठी जातीचे नियम होते. ज्यानुसार त्यांना मोठ्या प्रमाणात शुद्धीकरण करून घेतले जात होते.

राष्ट्रपती डॉ. अली

ब्रिटीश – गयानाला २२ मे १९६६ रोजी ग्रेट ब्रिटन पासून स्वातंत्र्य मिळाले.

स्वातंत्र्योत्तर राजकारणावर इंडो- गयानी लोकांचा प्रभाव खूप काही आहे. भारतीय इंडो गयानीज लोकांचे प्रतिनिधित्व करणारी पीपल्स प्रोग्रेसिव्ह पार्टी / सिविक पीपीसी/सी सध्या सत्ताधारी पार्टी आहे. ६५ पैकी ३६ खासदार या पक्षाचे आहेत, तर आफ्रिकन गयानीज लोकांचे प्रतिनिधित्व करणारे पीपल्स नॅशनल काँग्रेस, पीएनसी आहे. या पक्षाचे सोळा खासदार आहेत. डॉ. मोहम्मद इरफान अली सध्या राष्ट्रपती आहेत. त्यांचे पणजोबा हिंदुस्थानातून गयानाला आले होते. भरत जगदेव हे १९९९ ते २०११ या काळात गयानाचे राष्ट्रपती होते.

चेडी जगन हे १९५३ साला मध्ये भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान झाले. त्यांना राष्ट्रपित्याचा मान गयानामध्ये दिला जातो. १९९२ ते १९९७ काळात ते गयानाचे राष्ट्रपती होते. भरत जगदेव हे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत, रिपु दमन प्रसाद हे बराच

काळ उपराष्ट्रपती होते, पंतप्रधानही होते. भरत जगदेव हेही पूर्वी पंतप्रधान होते. मोझेस नागामुटू हे १५ ते २० वर्ष गयानाचे पंतप्रधान होते.

भारतीय सणांची पंरपरा कायम

इंडो- गयानी लोक आताही दिवाळी, फगवाह, महाशिवरात्री, हनुमान जयंती, राम नवमी, विजयादशमी, कृष्ण जन्माष्टमी, राधाष्टमी, सरस्वती जयंती, गणेश चतुर्थी, पिऊ गुरु बंदिशा सारखे सण साजरे करतात आणि त्यांना सुट्ट्या दिल्या जातात. कालभैरव जयंती, विवाह पंचमी, मकर संक्रांति, तुळशीपूजा, गीता जयंती, दत्त जयंती आणि रथयात्रा या इतर सण गयाना मध्ये पाळले जातात.

इंडो गयानी मुस्लिम रमजान महिन्यातील उपवास पाळ-तात. तसेच ईद-उल-फित्र, ईद-उल अजा, इस्लामी रीती

रिवाज पाळतात. गयानामध्ये २०१२ च्या जनगणनेनुसार, इंडो गयानीज लोकांची संख्या २९७४९३ आहे. यात गयाना मधील पूर्व बर्बीस, कॉरंटाईन, ऐसेक्विबो बेट, पश्चिम डेमेरारा, महाइका- बर्बीस, पोमेरोन-सुपेनाम, अप्पर डेमेरारा या ठिकाणी हिंदुस्तानी लोकांचे प्राबल्य आहे.

गयानातून पुन्हा इंडो- गयानी वंशाच्या पुढील पिढीने युनायटेड स्टेट्स, कॅनडा, युनायटेड किंगडम, नेदरलँड, सुरीनाम, त्रिनिदाद व टोबॅगो, बार्बाडोस, सेंट मार्टिन, व्हर्जिन बेटे व इतर कॅरिबियन देशातही जाऊन स्थायिक झालेले आ-हेत. तेथील संस्कृतीशी जुळवून घेताना, त्यांनी मिश्र संस्कृती निर्माण केली आहे.

खाद्य संस्कृती

गयानीज हिंदुस्तानी, मिश्र भाषा, तमिळ द. आशियातील इतर भाषांचा संगम होऊन मिश्र भाषा आजही तिथे प्रचलित आहेत. कॅरेबियन मधील संस्कृतीच्या मिश्रणामुळे इंडो-कॅरेबियन पदार्थांचे फ्युजन झाले आहे. ज्याच्यात करी, रोटी, डाळभात, आलू, कसावा, पराठा, साधा रोटी दोस्ती रोटी, आलु रोटी, पुऱ्या, रस्सम हे पदार्थही आहेत. हिंदू विवाह, सण व प्रार्थना सभांमध्ये मुख्य पदार्थ ‘सेवन करी’ म्हणून सात भाज्यांच्या समावेश असलेले पदार्थ असतात आंबा करी, बटाटा चणा करी, बैंगन करी, भोपळा कोहळा करी, पालक, शेवगा, काटेरी राजगिराच्या पानापासून बनवलेली भाजी, डाळ भात, कढी, भातखिचडी आहे. चोखा हा इंडो गयानीज लोकांमध्ये नाश्त्याचा आणि दुपारच्या जेवणाचा एक लोकप्रिय पदार्थ आहे. हा पदार्थ करण्यासाठी भाज्या भाजून साल काढतात आणि त्यात लसूण, कांदे, ढोबळी मिरची घालून घोळ-वून भाज्यांमध्ये मिसळून वांगी, टोमॅटो, नारळ प्रसंगी मासे आणि कोळंबीचाही वापर करतात. तो रोटी बरोबर खाल्ला जातो.

मिष्ठान्न मध्ये गुलाबजामुन, मोहन भोग, लाडू, मिठाई, जिलेबी, गुलगुला, बर्फी फालुदा, बदाम लच्छा, शेवया, खीर सर्वत्र आहे. तेथील पदार्थांचेही फ्युजन होऊन नवीन पदार्थ निर्माण झाले आहेत. १९५० च्या दशकाच्या सुरुवातीपासून बॉलीवूड चित्रपट गाण्यांच्या गयानाच्या पॉप संस्कृतीवर प्रभाव पडलेला आहे. शाहरुख खान, जूही चावला, प्रीती झिंटा सारखे अनेक मेगास्टार्सने गयानाला भेट देऊन कार्यक्रम सादर केले आहेत. सोनू निगम, आशा भोसले, अलका याज्ञिक, श्रेया घोषाल, उदित नारायण, सुनिधी चौहान, कुमार सानू, अनुप जलोटा सारखे लोकप्रिय गायकांनीही गयानामध्ये यशस्वी कार्यक्रम सादर केले आहेत. लता मंगेशकर यांचे १९८० मध्ये भव्य स्वागत करण्यात आलं होतं. तेथील राजधानी जॉर्ज टाउन या शहराची चावी त्यांना प्रेम व आदरापोटी भेट देण्यात आली होती..

झी, कलर्स टीव्ही, सोनी, स्टार प्लस इत्यादी वाहिन्या इकडेही लोकप्रिय आहेत. भारतीय नृत्य व संगीत कार्यक्रमात लोकप्रियता वाढत आहे. भजन, बॉलीवूड गाणी, शास्त्रीय गाणी भारतीय लोकसंगीत प्रसिद्ध आहे. लोकप्रिय स्थानिक इंडो कॅरिबियन गायकांमध्ये सुंदर पोपो, टेरी गजराज, रामदेव चैतो, द्रोपती, रवी बिसंभर, राकेश यंकरन, रिक्की जय, द्रुपती रामगुणाई आणि बबला आणि कांचन हे लोकप्रिय गायक आहेत. तबला, हार्मोनियम, ढोलकी, मंजिरा, सतार, खरताल, तस्सा डुमच्या वापरामध्ये गयानामध्ये भारतीय वाद्यांचा प्रभाव दिसतो.. उल्लेखनीय लेखकांमध्ये जोसेफ रूहोमन, मायुत्र बहादूर, महादाई दास, राजकुमारी सिंग, शाना यार्डन हे मुख्य आहेत. आर्य समाज स्मारक, सरस्वती विद्यानिकेतन सारख्या संस्था भारत आणि गयानातील भारतीय संस्कृतीचे बंध साता समुद्रापार या देशात घट्ट करीत आहेत. (क्रमशः)

उल्लेखनीय इंडोगयानीज

वहीद अली बॅरन अली, ब्रिटिश हाऊस ऑफ लॉर्ड्स मधील आजीवन सदस्य. मुहाबीर अनिल नंदलाल-वकील राजकारणी. शेख बक्ष-शिक्षण मंत्री. इसहाक बशीर-खासदार विक्रम भरत-राजकारण. रणजी चंडीसिंग – गयानाचे माजी उपराष्ट्रपती. व्हिन्सेंट टीका शिक्षण आणि संस्कृती मंत्री. रोनाल्ड गजराज – राजकारणी. चेडी जगन गयानाचे माजी राष्ट्राध्यक्ष (राष्ट्रपिता). भरत जगदेव गयानाचे उपराष्ट्रपती. डॉ. इरफान अली- गयानाचे सध्याचे अध्यक्ष.

सय्यद कमाल- लंडनचे ब्रिटिश युरोपीय खासदार. एडवर्ड लखू- माजी अध्यक्ष. लायनेल लखू- राजकारणी. जिना मिलर – ब्रिटिश वकील. मंजूर नादीर गयानाच्या राष्ट्रीय विधानसभेचे अध्यक्ष. मोझेस नागामुटु गयानाचे माजी पंतप्रधान. सासे नारायण गयानाच्या राष्ट्रीय विधानसभेचे माजी अध्यक्ष.

शिवसहाय नरेन- गायनाचे माजी उपराष्ट्रपती. दरमियान प्रसाद – माजी उपराष्ट्रपती, हिंदू पंडित. बलराम सिंग राय राजकारणी. खेमराज रामजतन माजी उपराष्ट्रपती. श्री दत्त रामपाल – माजी कॉमनवेल्थ सेक्रेटरी. डोनाल्ड राम अवतार माजी राष्ट्रपती.

विश्वेश्वर रामस्वरूप – माजी उपराष्ट्रपती. रामस्वरूप-राजकारणी. दुधनाथ सिंग ऍटर्नी जनरल, लखमन सुखनंदन माजी कॉन्सलेट जनरल. तारासिंग वर्मा राजकारणी. मार्क प्रसाद- वकील. रेमंड अब्लक – कॅनडियन अॅक्टर. अंजुली – कॅनडियन सिंगर. गायत्रा बहादुर -लेखक. देवबक्ष – गिटारिस्ट. शकिरा कायने-अभिनेत्री आणि मिस दास- कवी. मेलानी फि ओना- सिंगर. होना फॉक्स अभिनेत्री. टेरी गजराज – चटणी सिंगर. एम्मा हॅमिंग- मालटीज मॉडेल. हरिश्चंद्र खेमराज-लेखक. लक्ष्मी कालीचरण लेखक. इसाबेला लाफलँड-अभिनेत्री. सुचित्रा मताई- आर्टिस्ट. अविनाश अमेरिकन अॅक्टर. प्रियांका- कॅनेडियन टेलिव्हिजन प्रेझेंटर. मेलिंडा शंकर- कॅनेडियन अभिनेत्री. नंदिनी शरण- भजन सिंगर. प्रिन्सेस अनिसा सिंग- चटणी, सोका सिंगर. शाना यारदान कवी जेकप स्किपिओ-ब्रिटिश अभिनेता. टॅसी लोरेन्स ब्रिटिश अभिनेता. शिवनरेन चंदरपॉल – वेस्ट इंडीजचा क्रिकेटर. नरसिंग देवनारायण – वेस्ट इंडीजचा क्रिकेटर. रोहन कान्हाई वेस्ट इंडीजचा माजी क्रिकेटर. अलविन कालीचरण- माजी क्रिकेट कॅप्टन (वेस्ट इंडीज). महिंद्र नागामोटू वेस्ट इंडियन क्रिकेटर. क्रिस्कल प्रसाद-बुद्धिबळपटू. मार्क रामप्रकाश माजी क्रिकेटपटू इंग्लंड. राम नरेश सारवान वेस्ट इंडीज माजी क्रिकेट कॅप्टन. धनराज सिंग – बॉक्सर. देवेंद्र बिशू- वेस्ट इंडीज क्रिकेटर. माया तिवारी-हिंदू आध्यात्मिक शिक्षक, शब्बीर आली – मुस्लिम इमाम.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »