जागतिक नारळ दिन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज बुधवार, सप्टेंबर २, २०२६
युगाब्द : ५१२८
भारतीय राष्ट्रीय सौर — भाद्र दिनांक ११, शके १९४८

🌅 सूर्योदय : ०६:२४
🌇 सूर्यास्त : १८:५२
🌙 चंद्रोदय : २२:२३
🌙 चंद्रास्त : १०:५१

📜 शक संवत : १९४८ — पराभव
संवत्सर : पराभव
अयन : दक्षिणायन
ऋतू : वर्षा
चांद्रमास : श्रावण
पक्ष : कृष्ण पक्ष

🔹 तिथी : षष्ठी — ०४:२५, सप्टेंबर ३ पर्यंत
🔹 नक्षत्र : भरणी — ०१:४३, सप्टेंबर ३ पर्यंत
🔹 योग : ध्रुव — २१:१२ पर्यंत
🔹 करण : गर — १७:२१ पर्यंत
🔹 द्वितीय करण : वणिज — ०४:२५, सप्टेंबर ३ पर्यंत

☀️ सूर्य राशी : सिंह
🌙 चंद्र राशी : मेष

⏰ राहुकाळ : १२:३८ ते १४:१२
⏰ गुलिक काळ : ११:०४ ते १२:३८
⏰ यमगंड : ०७:५७ ते ०९:३१
⏰ अभिजित मुहूर्त : नाही
⏰ दुर्मुहूर्त : १२:१३ ते १३:०३
✨ अमृत काळ : २१:०६ ते २२:३८
⚠️ वर्ज्य : ११:५४ ते १३:२६

━━━━━━━━━━━━━━━━━━

🥥 🌏 आज आंतरराष्ट्रीय (जागतिक) नारळ दिन 🌴

दरवर्षी २ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय नारळ दिन साजरा केला जातो. नारळाचे मानवी जीवन, आरोग्य तसेच जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्त्व अधोरेखित करणे हा या दिवसाचा प्रमुख उद्देश आहे.

या दिवसाची सुरुवात २००९ मध्ये आशियाई व पॅसिफिक देशांच्या आंतरराष्ट्रीय नारळ समुदायाने (ICC) केली.

नारळाच्या झाडाला ‘कल्पवृक्ष’ किंवा ‘जीवनाचे वृक्ष’ असे म्हटले जाते. कारण नारळाच्या झाडाचा जवळजवळ प्रत्येक भाग—पाणी, करवंटी, खोबरे, तेल, पाने इत्यादी—मानवी जीवनासाठी उपयुक्त असतो.

🥥 भारत हा जगातील नारळ उत्पादन करणाऱ्या प्रमुख देशांपैकी एक आहे.

आज आंतरराष्ट्रीय (जागतिक) नारळ दिन आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━

🙏 🌺 संत तुकाराम महाराजांचा अभंग 🌺

कुळीं कन्या पुत्र, होती जे सात्विक ।
तयाचा हरिख, वाटे देवा ॥

पहाताती वाट, स्वर्गीचे पूर्वज ।
वंशी भक्तराज, व्हावा कोणी ॥

पुत्र नसलिया, कन्या तरी व्हावी ।
हरीगुण गाई, सर्वकाळ ॥

तुका म्हणे पितरे, आशीर्वाद देती ।
कल्याण इच्छिती, निरंतर ॥

━━━━━━━━━━━━━━━━━━

🌺 परमार्थातील प्रेरणादायी विचार
— परमपूज्य कलावती आई, बेळगाव

परमार्थात कलावती आईंनी नियमित उपासनेला विशेष महत्त्व दिले आहे.

आपला जठराग्नी विशिष्ट वेळेला भोजनाची वाट पाहतो, निद्रादेवी विशिष्ट वेळेला येते; त्याचप्रमाणे श्रीहरीदेखील आपल्या नियमित उपासनेची वाट पाहत असतो.

म्हणूनच नियमित, विशिष्ट वेळेची तसेच सामूहिक उपासना यांचे महत्त्व विशेष आहे, हे त्यांनी पटवून दिले.

🌸 कलावती आई, बेळगाव — आज जन्मदिन (दिनांकानुसार)

भाद्रपद शुक्ल पंचमी — ऋषी पंचमी

परमपूज्य आईंनी ०८ फेब्रुवारी १९७८ रोजी, माघ शुद्ध प्रतिपदेला महासमाधी घेतली.

━━━━━━━━━━━━━━━━━━

📚 🌿 मराठी साहित्याचे श्रेष्ठ साहित्यिक — वि. स. खांडेकर 🌿

मराठी साहित्याच्या अभिवृद्धीसाठी अखंडपणे कार्यरत असलेले श्रेष्ठ आणि समर्पित साहित्यिक विष्णू सखाराम खांडेकर, म्हणजेच वि. स. खांडेकर, हे महाराष्ट्रातील श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून ओळखले जातात.

शब्दप्रभुत्व, कल्पनावैभव, कोटीबाजपणा, वास्तववादी, व्यामिश्र आणि प्रयोगशील लेखन ही त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये होती.

खांडेकरांचे लेखन बहुविध स्वरूपाचे असून त्यात १५ कादंबऱ्या, ३१ लघुकथासंग्रह, १० लघुनिबंधसंग्रह, ६ रूपककथासंग्रह आणि १ नाटक, याशिवाय काही चरित्रात्मक, समीक्षात्मक व संकीर्ण लेखसंग्रहांचा समावेश आहे.

तसेच त्यांनी मराठी, हिंदी आणि तेलुगू चित्रपटांसाठी एकूण १८ पटकथा लिहिल्या.

१९६१ मध्ये ‘ययाति’ या कादंबरीस महाराष्ट्र सरकारचे कादंबरी विभागातील पहिले पारितोषिक मिळाले. त्याच वर्षी या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

आधुनिक जीवनाला ग्रासून टाकणाऱ्या भोगवादावर ‘ययाति’मध्ये भेदक भाष्य आढळते.

🏆 १९६८ : भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.

🏆 १९७४ : ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला.

🕯️ १९७६ : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कादंबरीकार वि. स. खांडेकर यांचे निधन.
(जन्म : १९ जानेवारी १८९८)

━━━━━━━━━━━━━━━━━━

🔬 🌿 वनस्पतीतज्ज्ञ डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर 🌿

वडिलांच्या बदल्यांमुळे आघारकरांचे शालेय शिक्षण विविध ठिकाणी झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. वनस्पतीशास्त्र व प्राणिशास्त्र हे विषय घेऊन त्यांनी बी.ए.ची परीक्षा प्रथम वर्गात उत्तीर्ण केली. पुढे त्यांनी एम.ए.ची पदवी मिळवली.

आघारकरांना वनस्पती आणि प्राण्यांचे नमुने गोळा करण्याची विशेष आवड होती. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये फिरत असताना त्यांनी गोड्या पाण्यात राहणाऱ्या एका जलचर प्राण्याच्या नवीन जातीचा शोध लावला. त्यांचे हे संशोधन ‘नेचर’ या प्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध झाले.

त्यानंतर शालेय शिक्षकाची मिळालेली नोकरी नाकारून ते कोलकात्याच्या इंडियन म्युझियममध्ये गेले. तेथे त्यांनी स्पंज जातीच्या प्राण्यांचे नमुने गोळा करणे व त्यांचे जतन करणे याचे प्रशिक्षण घेतले.

सह्याद्रीत फिरताना आघारकरांना एका नव्या इंगळीचा शोध लागला. या जातीला ‘क्रिप्टोहिप्टास आघारकारी’ असे नाव देण्यात आले.

आघारकरांनी दोन वर्षे जर्मनीत संशोधन करून पीएच.डी. मिळवली. युरोप, इंग्लंड आणि नेपाळमधील दुर्मीळ वनस्पतींचे नमुने त्यांनी गोळा केले.

हावडा येथील दुर्मीळ वनस्पतींचे नमुने लंडन येथे हलविले जाणार असल्याचे समजल्यावर त्यांनी त्यास विरोध केला आणि ते नमुने हलवू दिले नाहीत.

आघारकरांच्या प्रयत्नांमुळे दोन भारतीय विद्यार्थ्यांना लंडनमध्ये जाऊन अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळू लागली. त्यांच्या विद्यार्थ्यांनी भात, ताग (ज्यूट), आंबा, केळी अशा विविध पिकांवर संशोधन केले.

१९२४ सालच्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे आघारकर अध्यक्ष होते. त्यांच्या पुढाकाराने वाळलेल्या वनस्पतींची हर्बेरियम प्रदर्शने विविध ठिकाणी सुरू झाली.

आघारकर हे योजना आयोगाच्या मृदासंधारण व वनीकरण समितीचे अध्यक्ष होते.

१९४६ मध्ये कोलकात्यातून निवृत्त झाल्यानंतर ते पुण्यात आले आणि त्यांनी विज्ञानवर्धिनी संस्थेची स्थापना केली. तेथे वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, कवकशास्त्र इत्यादी विषयांवर संशोधन सुरू झाले.

ही विज्ञानवर्धिनी संस्था पुढे आघारकर संशोधन संस्था म्हणून ओळखली जाऊ लागली. आघारकरांनी पुणे व मुंबई येथील आपली सर्व स्थावर मालमत्ता या संस्थेला दान केली.

🕯️ १९६० : वनस्पतीतज्ज्ञ डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर यांचे निधन.
(जन्म : १८ नोव्हेंबर १८८४)

━━━━━━━━━━━━━━━━━━

📜 🌟 आजच्या दिनविशेषातील घटना 🌟

🔹 १९१६ : पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.

🔹 १९२० : महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलनाला सुरुवात.

🔹 १९३९ : दुसरे महायुद्ध — जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.

🔹 १९४५ : व्हिएतनामने जपान व फ्रान्सपासून स्वातंत्र्य घोषित केले.

🔹 १९४६ : भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.

🔹 १९६० : केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.

🔹 १९७० : राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.

💬 “माझ्या मृत्यूनंतरही मी माझे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी पुढील पिढीला प्रेरणा देत राहीन!”
— स्वामी विवेकानंद

🔹 १९९९ : भारतीय जलतरणपटू बुला चौधरी या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहून पार करणाऱ्या आशियातील पहिल्या महिला ठरल्या.

━━━━━━━━━━━━━━━━━━

🕯️ 🌼 आजच्या दिनविशेषातील निधन 🌼

🔸 १९९० : मराठवाड्याचा ‘चालताबोलता इतिहास’ अशी ओळख असणारे लेखक न. शे. पोहनेरकर यांचे निधन.
(जन्म : ३ ऑक्टोबर १९०७)

🔸 १९९९ : चित्रकार व लेखक डी. डी. रेगे यांचे निधन.
(जन्म : १७ डिसेंबर १९११ — पाचल, राजापूर, रत्नागिरी)

🔸 २००९ : आंध्र प्रदेशचे १४वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे विमान अपघातात निधन.
(जन्म : ८ जुलै १९४९)

🔸 २०११ : संगीतकार श्रीनिवास खळे यांचे निधन.
(जन्म : ३० एप्रिल १९२६)

🔸 २०१४ : भारतीय वकील व राजकारणी गोपाल निमाजी वाहनवती यांचे निधन.
(जन्म : ७ मे १९४९)

━━━━━━━━━━━━━━━━━━

🎂 🌺 आजचे जन्मदिन 🌺

🔹 १८३८ : भारतीय गुरु व तत्त्वज्ञ भक्तिविनोद ठाकूर यांचा जन्म.
(मृत्यू : २३ जून १९१४)

🔹 १८८६ : साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्न करणारे कृतिशील समाजसुधारक प्रा. श्रीपाद महादेव माटे तथा श्री. म. माटे यांचा जन्म.
(मृत्यू : २५ डिसेंबर १९५७)

🔹 १९४१ : चित्रपट अभिनेत्री साधना शिवदासानी ऊर्फ साधना यांचा जन्म.

🔹 १९६५ : भारतीय दिग्दर्शक व पटकथालेखक पार्थो सेन गुप्ता यांचा जन्म.

🔹 १९७१ : भारतीय अभिनेते व राजकारणी पवन कल्याण यांचा जन्म.

🔹 १९८८ : भारतीय क्रिकेटपटू इशांत शर्मा यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »