संत बाळूमामा स्मृतिदिन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज मंगळवार, सप्टेंबर १, २०२६ युगाब्द : ५१२८ भारतीय राष्ट्रीय सौर भाद्रपद दिनांक १०, शके १९४८

🌅 सूर्योदय : ०६:२३ 🌇 सूर्यास्त : १८:५३ 🌙 चंद्रोदय : २१:३७ 🌙 चंद्रास्त : ०९:५१

शक संवत : १९४८ — पराभव संवत्सर : पराभव अयन : दक्षिणायन ऋतू : वर्षा चांद्रमास : श्रावण पक्ष : कृष्ण पक्ष

तिथी : चतुर्थी — ०७:४१ पर्यंत क्षय तिथी : पंचमी — ०६:१२, सप्टेंबर ०२ पर्यंत

नक्षत्र : अश्विनी — ०२:४२, सप्टेंबर ०२ पर्यंत योग : वृद्धी — २३:३९ पर्यंत करण : बालव — ०७:४१ पर्यंत द्वितीय करण : कौलव — १८:५९ पर्यंत क्षय करण : तैतिल — ०६:१२, सप्टेंबर ०२ पर्यंत

सूर्य रास : सिंह चंद्र रास : मेष

राहुकाल : १५:४६ ते १७:२० गुलिक काल : १२:३८ ते १४:१२ यमगंड : ०९:३१ ते ११:०५ अभिजित मुहूर्त : १२:१३ ते १३:०३ दुर्मुहूर्त : ०८:५३ ते ०९:४३ दुर्मुहूर्त : २३:२९ ते ००:१५, सप्टेंबर ०२ अमृत काल : १९:४२ ते २१:१५ वर्ज्य : २२:४९ ते ००:२२, सप्टेंबर ०२

🌺 श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी जयंती

जितेंद्रियगणाग्रणीरभिरतः परे ब्रह्मणि । कलौ श्रुतिपथावनेऽत्रितनयोऽवतीर्णः स्वयम् ॥

करात्तसुकमण्डलु: कुमतखण्डने दण्डभृत् । पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यतिः ॥

आज श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी यांची जयंती.

श्रावण कृष्ण पंचमी, शके १७७६ रोजी त्यांचा जन्म झाला. जन्म : १३ ऑगस्ट १८५४

🌼 संत बाळूमामा — स्मृतिदिन

“मानवाने माणसासारखे जगावे.” ही संत बाळूमामांची अत्यंत महत्त्वाची शिकवण होती.

जात, पात किंवा वर्गभेद न मानता त्यांनी सर्व माणसांना समान मानले आणि सर्वांना मदतीचा हात दिला.

ईश्वरप्राप्तीसाठी कोणताही आडपडदा किंवा कठीण मार्ग आवश्यक नाही; मनाने साधे राहून अखंड नामस्मरण करावे आणि *‘रामकृष्ण हरी’*चा जप करावा, असा त्यांचा सोपा मूलमंत्र होता.

साधेपणा आणि कर्म यांनाही त्यांनी विशेष महत्त्व दिले. ते स्वतः आयुष्यभर मेंढपाळ म्हणून राहिले. साधे अन्न, साधे राहणीमान आणि प्रामाणिकपणे आपले कर्म करत राहणे, यावर त्यांचा भर होता.

भक्तांच्या श्रद्धेविषयी ते सांगत असत— “तुम्ही मला मृत मानाल तर मी मृत आहे; पण तुम्ही मला जिवंत मानाल तर मी जिवंत आहे.”

म्हणजेच भक्तांची श्रद्धा हीच त्यांची ऊर्जा होती.

आज संत बाळूमामा समाधी दिन / पुण्यतिथी तिथीनुसार आहे. आंग्ल दिनांक : ४ सप्टेंबर १९६६

🌺 समाजसंघटक दामुअण्णा दाते

श्री दामोदर माधव उपाख्य दामुअण्णा दाते यांचा जन्म ४ मार्च १९२७ रोजी झाला.

अलिबाग, जिल्हा रायगड येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर वडिलांच्या बदलीनुसार बारामती येथे त्यांनी पुढील शिक्षण घेतले. याच काळात त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला.

बारामती येथे अकरावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर, बारामती येथे परीक्षा केंद्र नसल्यामुळे त्यांनी मुंबई केंद्रातून मॅट्रिकची परीक्षा दिली. पुढे व्हीजेटीआय, मुंबई येथून विद्युत अभियांत्रिकीची पदविका त्यांनी संपादन केली.

१९४८ मध्ये रेल्वेच्या टेलिफोन विभागात त्यांनी नोकरीस सुरुवात केली. डिसेंबर १९४८ मध्ये संघबंदीविरोधातील सत्याग्रहामुळे त्यांना कारावास भोगावा लागला आणि त्याचा परिणाम म्हणून रेल्वेतील नोकरी गमवावी लागली.

मार्चमध्ये तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नोकरीची पर्वा न करता त्यांनी संघकार्याला स्वतःला वाहून घेण्याचा निर्णय घेतला. जून १९५० पासून सुरुवातीला मुंबईतील गिरगाव येथे प्रचारक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९५२ पासून नगर तालुका प्रचारक म्हणून त्यांनी कार्य केले.

तो संघासाठी अत्यंत कठीण आणि खडतर काळ होता. संघबंदी नुकतीच उठली होती. समाजातील अनेकांना संघ किंवा संघाची विचारसरणी परिचित नव्हती. अशा काळात संघकार्य आणि विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे मोठे आव्हान त्यांनी समर्थपणे पेलले.

त्यावेळी कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्याला त्यांनी अक्षरशः पिंजून काढले. नगर परिसर ही त्यांची कर्मभूमी झाली. सुमारे नऊ वर्षे नगर जिल्हा प्रचारक म्हणून कार्य केल्यानंतर पुणे-सातारा-नगर विभागाचे विभाग प्रचारक म्हणून १९६५ पासून त्यांनी जबाबदारी स्वीकारली.

१९६७ मध्ये कोयनानगर येथे झालेला भीषण भूकंप त्यांनी प्रत्यक्ष अनुभवला. दुसऱ्याच दिवशी कोयनानगर येथे संघयंत्रणेमार्फत मदतकार्याची योजना आखण्यात त्यांनी पुढाकार घेतला.

१९७१ च्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीत पुणे येथे ‘दुष्काळ विमोचन समिती’ सुरू करण्यात आली. पुढे या समितीचे ‘रा. स्व. संघ जनकल्याण समिती’ असे नामकरण झाले. राज्यभर सेवाकार्यांचे जाळे उभे करण्याच्या या उपक्रमात त्यांचा मोलाचा वाटा होता.

१९७१ मध्ये त्यांची सहप्रांत प्रचारक म्हणून नियुक्ती झाली. प्रामुख्याने अन्य क्षेत्रातील संस्था आणि संघकार्य यांच्यातील समन्वय व सुसूत्रीकरणाची जबाबदारी त्यांनी पार पाडली.

१९७५ मध्ये आणीबाणीच्या पूर्वकालखंडात भूमिगत राहून आणीबाणीविरोधी लोकसंघर्ष संघटित करण्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता.

१९९७ पासून गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि विदर्भ या पश्चिम क्षेत्राच्या क्षेत्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले.

‘साप्ताहिक विवेक’मध्ये त्यांनी ‘स्मरणशिल्पे’ नावाची लेखमाला सुरू केली. या माध्यमातून जुन्या कार्यकर्त्यांच्या आठवणी, प्रसंग आणि घटना त्यांनी पुन्हा एकदा सर्वांसमोर जिवंत केल्या.

सामाजिक समरसता हा त्यांच्या तळमळीचा आणि अथक परिश्रमाचा विषय होता. १९८४ मध्ये त्यांच्या पुढाकाराने सामाजिक समरसता मंचाची स्थापना झाली.

“स्वदेशी हा शब्द अर्थ हरवून बसला आहे, गुळगुळीत झाला आहे; समरसतेच्या संकल्पनेचे तसे होऊ नये. केवळ बौद्धिक चर्चा किंवा परिपाठाचा विषय न राहता दैनंदिन व्यवहारात समरसता आली पाहिजे,” याबाबत ते सातत्याने आग्रही होते.

आरक्षण पद्धती काय आहे, मंडल आयोग काय आहे, महिला आरक्षण विधेयक काय आहे, याची माहिती सर्वांनी करून घ्यावी, असा त्यांचा आग्रह असे.

ज्या परिसरात शाखा आहेत, त्या गावात सर्वांसाठी मंदिरप्रवेश, एक पाणवठा आणि एक स्मशानभूमी असावी, असा त्यांचा विचार होता.

संघ स्वयंसेवकांचे घर हे समाजपरिवर्तनाचे माध्यम व्हावे, शाखेतील एका तासात मिळालेले संस्कार उर्वरित २३ तासांच्या व्यवहारात प्रकट झाले पाहिजेत आणि त्यातून एकात्म समाजनिर्मिती घडली पाहिजे, हा विचार ते सतत स्वयंसेवकांसमोर मांडत.

“तील-तील कर के जलना पड़ता है, जल-जल कर के गलना पड़ता है, गल-गल करके मरना पड़ता है.”

सातत्याने केलेल्या अथक परिश्रमांमुळे त्यांना अनेक शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागले. मात्र कार्यरत असताना त्यांनी कधीही त्यांची तमा बाळगली नाही.

औरंगाबाद येथील बैठक संपवून पुण्याकडे येताना तळेगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमात ‘समरसता’ या विषयावर त्यांचे भाषण होणार होते. त्याच भाषणाची ते गाडीत चर्चा करत होते. चर्चा सुरू असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गाडीतच त्यांचे निधन झाले.

त्यांचा मृत्यू कसा झाला, हे सांगण्याचा हा खटाटोप नाही; तर शेवटच्या श्वासापर्यंत सतत जागणाऱ्या एका संघकार्यकर्त्याची, एका प्रचारकाची कार्यमग्नता अधोरेखित करणारी ही घटना आहे.

“जीवन कार्यमग्न व्हावे—मृत्यू ही विश्रांती.”

या उक्तीप्रमाणे त्यांची जीवनयात्रा थांबली.

त्यांच्या स्मृती आम्हाला ध्येयपूर्तीसाठी ‘चरैवेति, चरैवेति’ म्हणत पुढे आणि पुढे जाण्याची प्रेरणा देत राहतील—अगदी मृत्यूपर्यंत.

२००२ : रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक दामोदर माधव उपाख्य दामुअण्णा दाते यांचे निधन. जन्म : ४ मार्च १९२७

📜 इतिहासातील घटना

१९०६ : इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी अॅटॉर्नीची स्थापना झाली.

१९११ : पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली.

१९१४ : रशियातील सेंट पीट्सबर्ग शहराचे नाव बदलून पेट्रोग्राड करण्यात आले.

१९२३ : टोकियो आणि योकोहामा परिसरात झालेल्या भूकंपात सुमारे १,०५,००० जणांचा मृत्यू झाला.

१९३९ : जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. या घटनेमुळे दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली.

१९५१ : अर्नेस्ट हेमिंग्वे यांची The Old Man and the Sea ही कादंबरी प्रकाशित झाली. या साहित्यकृतीसाठी त्यांना पुलित्झर पुरस्कार मिळाला; पुढे त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीसाठी नोबेल पारितोषिक मिळाले.

१९५६ : भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना झाली.

१९६९ : लिबियात उठाव होऊन मुअम्मर गडाफी सत्तेवर आला.

१९७२ : अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस स्पास्कीचा बुद्धिबळात पराभव करून विश्वविजेतेपद मिळवले.

१९७९ : पायोनियर-११ अंतराळयान शनीपासून सुमारे २१,००० किमी अंतरावरून गेले.

१९८५ : संयुक्त अमेरिकन-फ्रेंच मोहिमेत बुडालेले RMS Titanic जहाज शोधण्यात आले.

१९९१ : उझबेकिस्तान सोव्हिएत संघापासून स्वतंत्र झाला.

🕯️ मृत्यू

१५८१ : शिखांचे चौथे गुरू, गुरू रामदास यांचे निधन. (जन्म : २४ सप्टेंबर १५३४)

१८९३ : प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडित, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे संस्थापक सदस्य, काँग्रेसचे चिटणीस आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचे निधन. (जन्म : ३० ऑगस्ट १८५०)

🎂 जन्म

१९०८ : हिंदी चित्रपटांतील गाजलेले खलनायक के. एन. सिंग यांचा जन्म. (मृत्यू : ३१ जानेवारी २०००)

१९१५ : उर्दू कथाकार आणि हिंदी पटकथालेखक राजिंदरसिंग बेदी यांचा जन्म.

१९२१ : यष्टिरक्षक व फलंदाज माधव मंत्री यांचा जन्म. (मृत्यू : २३ मे २०१४)

१९३१ : भारतीय शास्त्रज्ञ आणि विद्वान अब्दुल हक अन्सारी यांचा जन्म. (मृत्यू : ३ ऑक्टोबर २०१२)

१९४९ : लोकसभेचे सभापती आणि मेघालयचे मुख्यमंत्री पी. ए. संगमा यांचा जन्म. (मृत्यू : ४ मार्च २०१६)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »