बाईकवर खिशातील मोबाईलचा स्फोट; साखर कामगाराचा मृत्यू

मुजफ्फरनगर | शुगरटुडे

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. चालत्या बाईकवर खिशात ठेवलेल्या मोबाईलच्या बॅटरीचा अचानक स्फोट झाल्याने बाईकवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एका साखर कामगाराचा मृत्यू झाला आहे. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली.
मृत व्यक्तीची ओळख ४० वर्षीय विकास अंताल अशी झाली असून ते रहमतपूर गावचे रहिवासी होते. ते खैखेडी येथील उत्तम शुगर मिलमध्ये टोकन अटेंडंट म्हणून काम करत होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि ६ वर्षांची मुलगी व ३ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकास हे आपल्या आईला मजरा गावातील नातेवाईकांकडे सोडायला गेले होते. तिकडे भाच्याच्या वाढदिवसाच्या पार्टीतून ते आपल्या गावी परत येत होते. वाटेत एका चौकाजवळ त्यांच्या खिशातील मोबाईलचा जोरदार स्फोट झाला. या स्फोटामुळे त्यांचे बाईकवरील नियंत्रण सुटले आणि ते रस्त्यावर कोसळले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून कुटुंबीयांनी त्यांना खासगी आरोग्य रुग्णालयात हलवले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी सांगितले की, मोबाईल स्फोटानंतर बाईकवरून पडल्याने विकास यांना गंभीर दुखापत झाली होती. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल.






