कृष्णा साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना लवकरच पगारवाढ : चेअरमन भोसले

२०२६-२७ हंगामासाठी मिल रोलर पूजन उत्साहात…
कराड : सभासदांच्या आणि कामगारांच्या चांगल्या सहकार्यामुळे या हंगामात कृष्णा कारखान्याने विक्रमी गाळप केले. येत्या काळातही कृष्णा कारखान्याचा विकास आणि सभासदांचे हित हेच आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन चेअरमन डॉ. सुरेशबाबा भोसले यांनी केले.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६ – २७ च्या गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन उत्साहात संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.

कृष्णा कारखान्यातील कामगारांच्या कल्याणासाठी आमच्या संचालक मंडळाने नेहमीच सकारात्मक निर्णय घेतले आहेत. वेळोवेळी कामगारांना पगारवाढ देण्याबरोबरच उत्कृष्ट सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. लवकरच कृष्णा कारखान्यातील कामगारांना आणखी पगारवाढ देणार असल्याची ग्वाही चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी यावेळी दिली.
यावेळी व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, निवासराव थोरात, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, सयाजी यादव, जे. डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, दीपक पाटील, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, वैभव जाखले, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक माणिकराव पाटील, राजारामबापू पाटील सहकारी बँकेचे संचालक संग्राम पाटील, अजित पाटील, वसंतराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना चेअरमन डॉ. सुरेश भोसले म्हणाले, कृष्णा कारखाना संपूर्ण ऊस बिल देण्यात आघाडीवर राहिला आहे. तसेच राज्यात रोलर पूजन करण्यातही कृष्णा कारखान्याने आघाडी घेतली असून, कारखाना येत्या गळीत हंगामासाठी लवकरच सज्ज होणार आहे. आपल्या कारखान्याने आर्थिक शिस्त काटेकोरपणे जपली आहे. सभासदांच्या सर्व अपेक्षा कारखाना सातत्याने पूर्ण करत आला असून, येत्या काळातही सभासदांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. जगदीश जगताप यांनी आभार मानले. यावेळी जनरल मॅनेजर टेक्निकल बालाजी पबसेटवार, एम. के. कापूरकर यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कौतुकाची थाप….
कृष्णा कारखान्यातील वाहतूक विभागातील कर्मचारी अजित थोरात यांची कन्या प्रज्ञा थोरात हिची एम.पी.एस.सी.मधून टॅक्स असिस्टंटपदी निवड झाल्याबद्दल, तसेच कर्मचारी जयंत कणसे यांनी भारत पेट्रोलियमच्या ड्रायव्हर सुरक्षा रेटिंगमध्ये सर्वश्रेष्ठ ड्रायव्हर म्हणून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल व कर्मचारी मनोज हातेकर यांचे चिरंजीव आविष्कार याने सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत राज्यस्तरीय पुरस्कार पटकावल्याबद्दल त्यांचा सत्कार चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.






