नवीन उद्योजकांसाठी पाच दिवसांची विशेष प्रशिक्षण कार्यशाळा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे (MCDC) व्यवस्थापकीय संचालक श्री. मंगेश तिटकारे यांची ‘कृषीमाल निर्यात आणि युवकांसाठी संधी’ या विषयावर दूरदर्शनसाठी कृषी क्षेत्रातील जाणकार हेमंत जगताप घेतलेली विशेष मुलाखत


विशेष मुलाखत: कृषीमाल निर्यातीतून समृद्धीकडे – तरुणांसाठी सुवर्णसंधी

श्री. मंगेश तिटकारे (व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे)

प्रस्तावना: आज जगभरात कृषीमालाचे उत्पादन वाढत आहे, मात्र पिकवलेला शेतमाल नक्की विकायचा कुठे, ही शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या आहे. याच पार्श्वभूमीवर कृषीमाल निर्यातीमध्ये युवकांसाठी कोणत्या संधी आहेत, हे जाणून घेण्यासाठी आम्ही ‘महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे’ व्यवस्थापकीय संचालक श्री. मंगेश तिटकारे यांच्याशी संवाद साधला.

Mangesh Titkare interview by Hemant Jagtap

प्रश्न: सर, सर्वात आधी सांगा की ‘कृषीमाल निर्यात‘ म्हणजे नक्की काय आणि त्यासाठी जागतिक स्तरावर काही नियम आहेत का?

मंगेश तिटकारे: कृषीमाल निर्यातीमध्ये केवळ अन्नधान्यच नाही, तर फळे, फुले, प्रक्रियायुक्त अन्न (Processed Food), दुग्धजन्य पदार्थ आणि मांस यांचाही समावेश होतो . जागतिक स्तरावर निर्यात करताना त्या-त्या देशाची मानके पाळावी लागतात. १९५१ च्या पीक संरक्षण करारानुसार (FAO), एका देशातून दुसऱ्या देशात कीड किंवा रोग जाऊ नये म्हणून ‘फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट’ अनिवार्य असते. १९९५ मध्ये जागतिक व्यापार करार (WTO) अंमलात आल्यानंतर भारताला कृषी निर्यातीसाठी प्रचंड मोठी जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

प्रश्न: भारतीय कृषी निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा किती आहे? काही आकडेवारी सांगता येईल का?

मंगेश तिटकारे: भारताने २०२३-२४ मध्ये एकूण ८२० अब्ज डॉलरची निर्यात केली, ज्यामध्ये कृषीमालाचा वाटा ५१ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ४ लाख कोटी रुपये इतका होता. एकूण कृषी निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा १३ टक्के आह. विशेष म्हणजे, देशातून निर्यात होणाऱ्या एकूण द्राक्षांपैकी ९४% द्राक्ष एकट्या महाराष्ट्रातून जातात, ज्याची किंमत साधारण ३,३९४ कोटी रुपये आहे. तसेच आंबा (७९%), केळी (८२%), डाळिंब (७८%) आणि कांदा (८७%) यांमध्येही महाराष्ट्राचा दबदबा आहे.

प्रश्न: महाराष्ट्रातील युवकांसाठी या क्षेत्रात नक्की कोणत्या ‘कमोडिटीज‘ मध्ये संधी आहेत?

मंगेश तिटकारे: फुलांमध्ये गुलाबाची निर्यात ही एक मोठी संधी आहे. तसेच आंबा पल्प (गर) आणि कांदा निर्यातीत आपण आघाडीवर आहोत. युवकांसाठी केवळ प्रत्यक्ष शेतीच नाही, तर काढणीपश्चात व्यवस्थापन (Post-Harvest Management), लॉजिस्टिक, पॅकिंग, ब्रँडिंग आणि कोल्ड स्टोरेज यांसारख्या क्षेत्रांतही मोठ्या उद्योजकीय संधी आहेत.

प्रश्न: ‘जीआय टॅगिंग‘ (GI Tagging) बद्दल सध्या खूप चर्चा आहे. निर्यातीत त्याचे महत्त्व काय?

मंगेश तिटकारे: ‘जीआय टॅग’ म्हणजे त्या भागातील माती आणि चवीचे वैशिष्ट्य दर्शवणारे प्रमाणपत्र. भारतात ४१७ उत्पादनांना जीआय टॅग आहे, ज्यापैकी ३७-३८ उत्पादने महाराष्ट्रातील आहेत. जळगावची केळी, नागपूरची संत्री, लासलगावचा कांदा, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आणि हापूस आंबा ही याची उत्तम उदाहरणे आहेत. जीआय टॅग असलेल्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत अधिक मागणी आणि चांगली किंमत मिळते.

प्रश्न: महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (MCDC) नवीन उद्योजकांना कशी मदत करते?

मंगेश तिटकारे: आम्ही केंद्र सरकारच्या ‘नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑर्गॅनिक लिमिटेड’साठी नोडल एजन्सी म्हणून काम करत आहोत. नवीन उद्योजकांसाठी आम्ही पाच दिवसांची विशेष प्रशिक्षण कार्यशाळा (निवासी आणि अनिवासी) आयोजित करतो. यामध्ये निर्यातीसाठी लागणारी २० प्रकारची प्रमाणपत्रे, लायसन्स, आयातदार कसा शोधायचा आणि इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मचा वापर कसा करायचा, याचे सविस्तर मार्गदर्शन केले जाते.

प्रश्न: निर्यातीसाठी ‘आपेडा‘ (APEDA) सारख्या संस्थांचे कार्य काय आहे?

मंगेश तिटकारे: आपेडा (APEDA) ही वाणिज्य मंत्रालयांतर्गत असलेली संस्था असून ती निर्यात विकास प्राधिकरण म्हणून काम करते. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे, तृणधान्यांचा (Millets) प्रचार करणे आणि निर्यातीसाठी ‘ग्रेपनेट’ (Grapenet), ‘अनारनेट’ (Anarnet) सारखे तांत्रिक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे, ही त्यांची प्रमुख कामे आहेत. याद्वारे शेतातील लागवडीपासून ते निर्यातीपर्यंतची सर्व माहिती (Traceability) संकलित केली जाते, ज्यामुळे भारतीय शेतमालाचा दर्जा जागतिक स्तरावर सिद्ध होतो.

प्रश्न: शेवटी, उद्योजक बनू इच्छिणाऱ्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल?

मंगेश तिटकारे: युवकांनी केवळ पारंपरिक व्यवसाय न करता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी. तुम्ही शेतकरी उत्पादक गट (FIG) किंवा कंपनी (FPC) स्थापन करू शकता. प्रत्यक्ष निर्यातीसोबतच पॅकिंग, ब्रँडिंग किंवा लॉजिस्टिक यांसारख्या एका विषयातील ‘तज्ज्ञ’ (Expert) बनूनही तुम्ही मोठे काम करू शकता. तुमच्या हातातील मोबाईलचा वापर माहिती शोधण्यासाठी करा. कृषी मंत्रालय, आपेडा आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या वेबसाईटवर सर्व माहिती उपलब्ध आहे. संधी मोठी आहे, फक्त ती चोखळण्याची जिद्द हवी!

(सौजन्य – दूरदर्शन)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »