डॉ. यशवंत कुलकर्णी यांना ‘रिअल ॲचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र २०२६’ पुरस्काराने गौरव

पुणे : सहकार, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांना प्रतिष्ठेच्या “रिअल ॲचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र २०२६” पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
पुणे येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना गौरविण्यात आलेल्या या कार्यक्रमात डॉ. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाची विशेष दखल घेण्यात आली.
पुरस्कार वितरण सोहळ्यात इन्कम टॅक्स कमिशनर अजय केसरी, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. कुलकर्णी यांना स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी उद्योग, प्रशासन, सहकार, सामाजिक कार्य आणि उद्योजकता क्षेत्रातील अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमात राज्यभरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
कारखान्याच्या प्रगतीमागील प्रभावी नेतृत्व
डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत कारखान्याला प्रगतीच्या दिशेने नेले आहे. ऊस विकास, आर्थिक शिस्त, उत्पादनक्षमता आणि शेतकरी-केंद्रित धोरणांमुळे कारखान्याने राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. साखर उद्योगातील दीर्घ अनुभव, वित्तीय व्यवस्थापनातील कौशल्य आणि आधुनिक व्यवस्थापन पद्धतींचा वापर यामुळे त्यांनी कारखान्याच्या कामकाजात सकारात्मक बदल घडवून आणल्याचे मानले जाते. (Pandurang Sugar)
पांडुरंग कारखान्याच्या स्थापनेपासून संस्थापक स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांची विचारधारा आणि सहकार चळवळीची परंपरा जपत कारखान्याने सातत्याने विकास साधला आहे. चेअरमन प्रशांत परिचारक, संचालक मंडळ आणि सभासदांच्या सहकार्यामुळे कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम संस्थांपैकी एक म्हणून पुढे येत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
सहकार क्षेत्रातील योगदानाची दखल
डॉ. कुलकर्णी यांचा साखर उद्योगातील प्रवास विविध जबाबदाऱ्यांमधून घडला आहे. त्यांनी यापूर्वी अनेक साखर कारखान्यांमध्ये लेखा, प्रशासन आणि व्यवस्थापन क्षेत्रात काम केले आहे. साखर उद्योगातील आर्थिक नियोजन, कार्यक्षमता वाढ आणि शेतकरी हिताच्या उपक्रमांमुळे त्यांना विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे.
साखर उद्योगासमोरील बदलती आव्हाने, इथेनॉल, हरित ऊर्जा, तंत्रज्ञान आणि स्पर्धात्मक व्यवस्थापन यांचा स्वीकार करून सहकारी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेत हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
पुरस्कार स्वीकारताना डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबीयांची तसेच कारखान्याशी संबंधित मान्यवरांची उपस्थिती होती. वृशाली कुलकर्णी, सोहम कुलकर्णी, डॉ. मृणाल कुलकर्णी, अनुप कुलकर्णी यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि सहकारी क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
या सन्मानामुळे पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्याला नवी ओळख मिळाली असून सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या तरुण व्यवस्थापकांसाठी डॉ. यशवंत कुलकर्णी यांचे कार्य प्रेरणादायी ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.






