गडकरींची बदनामी; नागपुरात गुन्हा दाखल

नागपूर । शुगरटुडे वृत्त
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याविषयी सोशल मीडियावर दिशाभूल करणारी व बदनाम करणारी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. देशातील एक लाॅबी इथेनाॉलवरून गडकरींविराेधात सक्रिय असून, नाहक बदनामी करत आहे.
तक्रारीनुसार, एका यूट्यूब चॅनेलवर तसेच इन्स्टाग्रामवरील काही पोस्टमधून गडकरी यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल, अशा स्वरूपाचे व्हिडिओ आणि मजकूर प्रसारित करण्यात आला होता. संबंधित सामग्रीमध्ये तथ्यहीन आणि दिशाभूल करणारे आरोप करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील तसेच माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. संबंधित सोशल मीडिया खात्यांची माहिती, डिजिटल पुरावे आणि प्रसारित सामग्रीचा स्रोत याचा तपास केला जात असून आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सायबर माध्यमांचा गैरवापर करून व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्याच्या प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही तपास यंत्रणांनी दिला आहे.





