लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे रोलर पूजन

सातारा । शुगरटुडे वृत्त
आगामी गळीत हंगाम अधिक कार्यक्षम, नियोजनबद्ध आणि विक्रमी करण्यासाठी शेतकरी, सभासद, अधिकारी, कर्मचारी आणि संचालक मंडळाने एकदिलाने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी केले.

कारखान्यात आयोजित रोलर पूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, कारखान्याचा विस्तार पूर्ण झाला असून नव्या गळीत हंगामात अधिक ऊस गाळप करण्याची क्षमता निर्माण झाली आहे. याचा थेट फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार असून वेळेत ऊस गाळप करण्यासाठी व्यवस्थापनाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे.
यशराज देसाई म्हणाले, कारखान्याची प्रगती ही केवळ व्यवस्थापनामुळे नव्हे, तर शेतकरी आणि सभासदांच्या विश्वासामुळे शक्य झाली आहे. त्यामुळे आगामी हंगामात प्रत्येकाने सकारात्मक भूमिका घेत सहकार्य करावे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, वेळेवर नियोजन आणि कार्यक्षम अंमलबजावणी यामुळे कारखाना आणखी सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास संचालक, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी गळीत हंगाम विक्रमी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.






