E20 पेट्रोल वादावर नितीन गडकरींचा मोठा खुलासा

तांत्रिक स्पष्टीकरण आणि ‘आत्मनिर्भर भारता’चा संकल्प
नवी दिल्ली: शुगरटुडे वृत्त
देशात सध्या E20 पेट्रोल (२०% इथेनॉल मिश्रित पेट्रोल) मुळे गाड्यांचे मायलेज कमी होत असल्याच्या आणि इंजिनमध्ये बिघाड होत असल्याच्या तक्रारींवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी या वादाला केवळ तांत्रिक न ठेवता देशाच्या आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षेशी जोडले आहे.
नितीन गडकरी यांनी ‘ABP न्यूज‘ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक प्रश्नांना सडेतोड उत्तर दिली, तसेच पत्रकाराच्या अर्धवट ज्ञानावर बोट ठेवले.
मायलेजमधील घट आणि तांत्रिक वास्तव:
गडकरी यांनी स्पष्टपणे मान्य केले की, इथेनॉल आणि पेट्रोलच्या ‘कॅलोरिफिक व्हॅल्यू’मध्ये (उष्मांक) फरक असतो, ज्यामुळे मायलेजवर परिणाम होऊ शकतो. मात्र, त्यांनी फ्लेक्स फ्युअल किंवा हायब्रिड वा्हनांबद्दल असेही स्पष्ट केले की, शहरात गाडी चालवताना वारंवार गियर बदलल्यामुळे आणि ब्रेक लावल्यामुळे निर्माण होणाऱ्या ऊर्जेने हे नुकसान भरून निघते. हायवेवर मात्र मायलेजमध्ये काही प्रमाणात घट जाणवू शकते.
गाड्यांची सुरक्षा आणि कंपन्यांची जबाबदारी:
इंजिन बिघडण्याच्या अफवांवर भाष्य करताना गडकरी म्हणाले की, टोयोटा, सुझुकी आणि टीव्हीएस सारख्या मोठ्या कंपन्या ४-४ वर्षे चाचणी केल्याशिवाय कोणतेही मॉडेल बाजारात आणत नाहीत. “ज्या ग्राहकांच्या गाड्या गॅरंटी पिरीयडमध्ये आहेत, त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. ग्राहकांनी थेट डीलरकडे जाऊन मशीनवर मायलेज तपासावे आणि तक्रार असल्यास मंत्रालयाला ईमेल करावा,” असे आवाहन त्यांनी केले.
इथेनॉल धोरणामागचा उद्देश:
गडकरींच्या मते, भारताचा २२ लाख कोटी रुपयांचा कच्च्या तेलाची आयात खर्च कमी करणे हा या धोरणाचा मुख्य हेतू आहे. यामुळे होणारे प्रदूषण ४० टक्क्यांनी कमी होईल आणि हा पैसा विदेशी कंपन्यांऐवजी भारतीय शेतकऱ्यांच्या खिशात जाईल. मका आणि उसाला मिळणारा वाढीव भाव हे याच धोरणाचे यश असल्याचे त्यांनी नमूद केले.
नितीन गडकरींनी पत्रकाराला कसे सुनावले?
मुलाखतीदरम्यान जेव्हा पत्रकाराने तांत्रिक माहितीशिवाय आणि सोशल मीडियावरील अपुऱ्या माहितीच्या आधारे प्रश्न विचारले, तेव्हा गडकरींनी त्यांना अत्यंत कडक शब्दात सुनावले.
- पुराव्याशिवाय बोलू नका: पत्रकाराने स्वतःच्या गाडीचे मायलेज कमी झाल्याचा दावा केल्यावर त्यांनी विचारले, “तुम्ही मायलेज मोजले कसे? ते मोजण्यासाठी मशीन लागते, जे कोणाच्याही घरी नसते” . त्यांनी पुढे सुनावले की, कोणत्याही पुराव्याशिवाय किंवा तथ्याशिवाय घटना घडण्यापूर्वीच कोणाला ‘सजा’ देऊ नका .
- डॉक्टरचे उदाहरण: “तब्बेत खराब झाली तर घरी बसून डॉक्टरला शिव्या द्याल का?” असा प्रश्न विचारत त्यांनी पत्रकाराला सुनावले की, तक्रार असेल तर ती अधिकृतपणे डीलरकडे नोंदवा, केवळ सोशल मीडियावर बोलून चालणार नाही.
- अब्रुनुकसानीचा इशारा: जेव्हा पत्रकाराने गडकरींच्या मुलाच्या कंपनीच्या नफ्याबाबत सोशल मीडियावरील आकडेवारी वाचून दाखवली, तेव्हा गडकरींचा पारा चढला. त्यांनी थेट सांगितले की, “तुम्ही खोटे बोलत आहात. जर तुम्ही या खोट्या माहितीचा आधार घेऊन बोलत असाल, तर मी तुमच्यावर अब्रुनुकसानीचा दावा (Defamation Case) करू शकतो”.
- विषय समजून घ्या: “हा विषय तांत्रिक आहे, त्यामुळे एक वाक्य पकडून अर्थ काढू नका. आधी पूर्ण विषय समजून घ्या आणि मग प्रश्न विचारा,” असे म्हणत त्यांनी पत्रकाराच्या अर्धवट माहितीवर बोट ठेवले\
(शुगरटुडेची भूमिका : आम्ही इथेनॉल धोरणाचे जाहीरपणे समर्थन करतो. काही लोकांच्या वाहनांचे मायलेज कमी होण्यापेक्षा आम्हाला देशाच्या मायलेजची चिंता आहे. इराणवर लादलेल्या संघर्षामुळे पेट्रोलियम पुरवठा घटला तेव्हा देशाची काय अवस्था झाली, हे आपणा सर्वांना माहिती आहे. आम्हीदेखील ई-२० पेट्रोलच्या गाड्या वापरतो. पण अशा कुचक्या तक़्रारी करत नाही. गडकरींची मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराने विचारले की, देशाची क्रूड तेल आयात वाढलीच आहे. ती का? त्याचे साधे उत्तर आहे, की वाढलेली आयात सरकारने केली की इथल्या खासगी उद्योगाने… भारतात खासगी पेट्रोलियम रिफायनरी आहेत, त्या विदेशातील कच्चे तेल आयात करून बांगलादेश, श्रीलंकेसह इतरही अनेक राष्ट्रांना विकतात. सौदी अरेबियांसह अनेक आखाती राष्ट्रे भारताकडून पेट्रोल-डिझेल विकत घेतात, हे अनेकांना माहिती नसेल. त्यांच्याकडे क्रूड तेल आहे; पण रिफायनरी नाही.
एका अहवालानुसार आगामी पाच-सहा दशकांमध्ये पृथ्वीच्या पाेटातील क्रूड तेल साठा संपणार आहे. त्यामुळे जगाला पर्यायी इंधनाचा विचार करणे सक्तीचे आहे. त्याची सुरुवात इथेनॉलपासून झाली असेल, तर त्याचे स्वागतच आहे.
मंत्र्यांनी किंवा उद्योजकांनी विमानांमध्ये मुलाखती देणे बंद करावे. ते अत्यंत धोकादायक आहे. )





