कल्पकता, कष्ट आणि नेतृत्वाचा संगम : एस. बी. भड यांचा गौरवशाली प्रवास

एस. एस. इंजिनिअर्स या नामवंत कंपनीचे संस्थापक, दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’चे माजी अध्यक्ष आणि साखर उद्योग क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व श्री. शहाजीराव भड अर्थात एस. बी. भड यांचा 1 जून रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा!
श्री. भड हे भारताच्या साखर उद्योग क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व आहेत. ते साखर उद्योग क्षेत्रात १९७२ पासून कार्यरत आहेत, तब्बल ५३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले ते डिझाईन इंजिनियर आहेत. सुमारे साडेचार दशकांपूर्वी त्यांनी एस. एस. इंजिनिअर्स ही कंपनी दहा वर्षे सर्व्हिस केल्यानंतर स्थापन केली आणि मोठ्या कष्टाने ती नावारूपास आणली. साखर उद्योगातील लोकांचा विश्वास कमावला. त्यांनी नुकतेच पंजाबमध्ये दोन महत्त्वाचे साखर कारखाने (टर्नकी प्रकल्प) पूर्ण केले.
एस एस इंजिनिअर्स (S S Engineers) ही कंपनी १९८० पासून म्हणजेच ४५ वर्षांपासून कार्यरत आहे. श्री. भड यांनी सीओईपी (COEP) पुणे येथून बी. ई. मेकॅनिकल पूर्ण केल्यानंतर वालचंद नगर इंडस्ट्रीजमध्ये पाच वर्षे डिझाईन इंजिनियर म्हणून आणि त्यानंतर पाच वर्षे साखर उद्योगात सल्लागार म्हणून काम केले. पुढे संपूर्ण टर्नकी शुगर प्लांट्स (Complete Turnkey Sugar Plants) बनवायला सुरुवात केली.
एस. एस. इंजिनिअर्सने पंजाब, राजस्थान, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात एकूण ४२ टर्नकी प्रकल्प उभे केले आहेत. एकूण प्रकल्पांपैकी ७५ टक्के प्रकल्प महाराष्ट्रातील आहेत, तर २५ टक्के महाराष्ट्राबाहेर आहेत. सध्या आणखी दोन कारखान्यांची उभारणी सुरू आहे. टर्नकी प्रोजेक्ट्स (४४) व्यतिरिक्त, १२० बॉयलर आणि ३०० मिल (Mill) बसवले आहेत. तसेच, १०० हून अधिक बॉयलिंग हाऊस (Process Equipment) विविध साखर कारखान्यांमध्ये स्थापित केले आहेत. आठ डिफ्युजर्स, पाच डिस्टिलरीज उभारण्यासह व इतर अनेक विस्तार प्रकल्पदेखील पूर्ण केले आहेत.
प्रख्यात बजाज हिंदुस्थान या कंपनीच्या प्रत्येकी दहा हजार टन प्रति दिन गाळप क्षमता असलेल्या तीन युनिटचाही त्यात समावेश आहे.
श्री. भड यांनी 1972 मध्ये पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी घेतली. चांगले गुण घेऊन पास झाल्याने नोकरीचा प्रश्न सुटला होता. वालचंद नगर इंडस्ट्रीजमध्ये डिझाईन इंजिनिअर म्हणून शहाजीराव भड रुजू झाले. तिथे साधारण पाचेक वर्षे काम केले. त्यानंतर त्यांनी जे.पी. मुखर्जी अॅन्ड असोसिएटमध्ये सल्लागार म्हणून काही काळ काम केले. या अनुभवाच्या जोरावर त्यांनी स्वतःची सल्लागार कंपनी सुरू केली.
काही वर्षे उद्योगांना तांत्रिक सल्ला दिल्यानंतर ते प्रत्यक्ष उत्पादन क्षेत्रात उतरले. अंगभूत संशोधक वृत्ती, सतत नवनव्या कल्पनांचा पुरस्कार आणि त्या तडीस नेण्यासाठीची जबरदस्त इच्छाशक्ती या गुणांच्या जोरावर श्री. भड यांनी भोसरी एमआयडीसीत ’एस.एस इंजिनियर्स’ या स्वतःच्या कंपनीची तुटपुंज्या भांडवलावर स्थापना केली. कंपनी नावारूपास आणण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आज एस. एस. इंजिनिअर्स साखर उद्योग इंजिनिअरिंग क्षेत्रातील आघाडीचे नाव आहे. ‘टर्न की प्रोजेक्ट्स’मध्ये एस. एस. इंजिनिअर्सचा विशेष दबदबा आहे. आज एस. एस. इंजिनिअर्समध्ये अभियंते, संशोधकांसह शेकडो लोक काम करतात..
पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीच्या भोसरी एमआयडीसीतील ही कंपनी जागतिक पातळीवर नावाजलेली कंपनी बनली आहे. श्री. भड यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीने यशोशिखर गाठले आहे. श्री. भड मूळचे बार्शी तालुक्यातील (जि. सोलापूर) गौडगांवचे. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत शेताच्या बांधावरून सुरू झालेला त्यांचा प्रवास अनेक संकटांवर मात करत ग्लोबल उद्योगापर्यंत पोहचला आहे. त्यांची जीवनगाथा तरूण पिढीसाठी केवळ मार्गदर्शकच नाही, तर सदैव प्रेरणादायी आहे. ‘शून्यातून विश्वनिर्मिती’ ही उपमा ज्यांना शोभून दिसते, त्यात श्री. भड यांचे नाव अग्रणी आहे. त्यांनी प्रचंड कष्टातून हे विश्व निर्माण केले आहे, त्यामुळे त्यांचे स्थान अढळ तार्यासारखेच आहे.
दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असो. (इंडिया) या नामांकित संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी श्री. भड यांनी 2022 ते २०२६ या काळात सांभाळली. त्यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून संस्थे मध्ये अनेक लोकाभिमुख बदल केले. बरीच नवी मंडळी संस्थेला जोडली. नवनवीन उपक्रम हाती घेतले. त्यातून संस्थेची राखीव गंगाजळी वाढवली.
ते जेथे जेथे हात घालतात, तेथे यशाचे नवे मापदंड निर्माण करतात. डीएसटीएमध्येही त्यांनी आपल्या कल्पकतेने आणि नेतृत्व कौशल्याने संस्थेला नवे आयाम दिले आहेत. सकारात्मक विचार, धाडसी वृत्ती, सदैव कामात गुंतवून ठेवण्याचा स्वभाव, साखरेपेक्षाही मधुर वाणी, तरीही निर्णय कठोरता, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती, कल्पकता, निर्णय क्षमता, दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि यशाच्या शिखरावर जाऊनही जमिनीशी कायम नाते जपण्याचा स्वभावगुण… अशी त्यांची काही वैशिष्ट्ये सांगता येतील.
त्यांना उत्तम आरोग्यासह उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!






