E20 हे केवळ सुरुवात आहे, आता भारताने E50 चे लक्ष्य ठेवावे : समीर सोमय्या

‘गोदावरी बायो-रिफायनरीज लिमिटेड’चे (GBL) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक समीर सोमय्या यांची इंधन क्षेत्रातील भविष्यातील वाटचालीवर आधारित एक विशेष मुलाखत दिली आहे:
भारताने पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिश्रणाचे (E20) उद्दिष्ट वेळेआधीच पूर्ण केले असून, १ एप्रिल २०२६ पासून देशभर हे इंधन अनिवार्य होत आहे. या पार्श्वभूमीवर, इथेनॉल निर्मिती क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व आणि ‘गोदावरी बायो-रिफायनरीज लिमिटेड’चे सर्वेसर्वा समीर सोमय्या यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.
प्रश्न: १ एप्रिल २०२६ पासून देशभरात E20 पेट्रोल अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, याकडे तुम्ही कसे पाहता?
समीर सोमय्या: मी या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो. भारताच्या ऊर्जा संक्रमणाच्या प्रवासातील हा एक अत्यंत सकारात्मक संकेत आहे. खरं तर, सरकारने सुरुवातीला २०३० पर्यंतचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु धोरणात्मक पाठबळ आणि उद्योगांच्या सक्रिय सहभागामुळे आपण २०२५ मध्येच हे यश मिळवले आहे. आता इ २० हा आपला राष्ट्रीय पाया (National Baseline) बनला आहे.
प्रश्न: तुम्ही नुकतेच एक विधान केले की, आता आपण थेट ५०% इथेनॉल मिश्रणाचे इ ५० लक्ष्य ठेवले पाहिजे. हे खरोखर शक्य आहे का?
समीर सोमय्या: निश्चितच! हे पूर्णपणे साध्य करण्यासारखे आहे. यासाठी माझ्याकडे दोन मुख्य तर्क आहेत. पहिले म्हणजे, आज भारतीय उद्योगांकडे मिश्रणाची टक्केवारी वाढवण्यासाठी पुरेशी क्षमता आणि लवचिकता आहे. दुसरे म्हणजे, भारताला जीवाश्म इंधनापासून दूर जायचे असेल, तर आपल्याला फ्लेक्स फ्युएल वाहनांना चालना द्यावी लागेल.
प्रश्न: फ्लेक्स फ्युएल वाहनांच्या बाबतीत सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत?
समीर सोमय्या: ज्याप्रमाणे इलेक्ट्रिक वाहनांना धोरणात्मक सवलती आणि प्रोत्साहन दिले जाते, त्याच धर्तीवर फ्लेक्स फ्युएल वाहनांनाही समान संधी मिळायला हवी. सुरुवातीच्या टप्प्यात या वाहनांसाठी सवलती किंवा सबसिडी दिल्यास त्यांचा वापर वाढेल. जेव्हा बाजारपेठ स्थिरावेल, तेव्हा या सवलती काढून घेता येतील. केवळ इलेक्ट्रिक वाहनांद्वारे आपण ‘नेट झिरो’ चे लक्ष्य गाठू शकत नाही, त्यात मिश्रित इंधनांची भूमिका निर्णायक असेल.
प्रश्न: अधिक इथेनॉल मिश्रणामुळे पर्यावरणाला नक्की काय फायदा होईल?
समीर सोमय्या: इथेनॉल हे पारंपरिक पेट्रोलच्या तुलनेत अधिक स्वच्छ जळते. त्यामुळे उत्सर्जनात लक्षणीय घट होते. साधे गणित आहे- जसजसे मिश्रणाचे प्रमाण वाढेल, तसतसे प्रदूषण कमी होईल. इ २० च्या तुलनेत इ ५० हे अधिक पर्यावरणपूरक असेल.
प्रश्न: जुन्या वाहनांच्या मालकांमध्ये इ २० बद्दल थोडी धास्ती आहे. इ ५० मुळे हा प्रश्न अधिक गंभीर होणार नाही का?
समीर सोमय्या: २०२३ नंतर तयार झालेली वाहने या मिश्रित इंधनावर चालण्यासाठी सक्षम आहेत. मात्र, जुन्या वाहनांमधील रबर, प्लास्टिक आणि इंजिनच्या काही भागांवर मिश्रित इंधनाचा परिणाम होऊ शकतो, तसेच मायलेजमध्येही थोडी घट जाणवू शकते. हे खरे असले तरी, भविष्यातील शाश्वत इंधनाकडे वळताना आपल्याला या बदलांना सामोरे जावेच लागेल.
प्रश्न: इथेनॉल उत्पादनासाठी ऊस की धान्य (मका), कशावर जास्त भर असावा असे तुम्हाला वाटते?
समीर सोमय्या: आमची कंपनी प्रामुख्याने उसापासून इथेनॉल बनवते, पण सध्या बाजारपेठेत मका आधारित उत्पादनांचे वर्चस्व आहे. मका आधारित इथेनॉलचा वाटा साधारण ४६% आहे, तर उसाचा वाटा २८% आहे. तथापि, उसापासून मिळणाऱ्या इथेनॉलचा पुरवठा (Off-take) अधिक वेगाने होतो. आमचे तत्व स्पष्ट आहे- ‘अन्न प्रथम, इंधन नंतर‘ (Food First, Fuel Second). अतिरिक्त अन्नधान्य आणि उसाचा वापर करून आपण देशाची ऊर्जा सुरक्षा वाढवू शकतो आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही सुधारू शकतो.
प्रश्न: समारोप करताना, भारताच्या इंधन भविष्याबद्दल काय सांगाल?
समीर सोमय्या: केवळ विद्युतीकरणावर अवलंबून राहून चालणार नाही. यामध्ये शेती, पुनरुत्पादक कृषी (Regenerative Agriculture) आणि जैव-आधारित मूल्य साखळी (Bio-based value chains) या सर्वांची भूमिका महत्त्वाची असेल. इ ५० कडे वळणे हे केवळ इंधन बदलणे नसून, ती एक हरित क्रांती असेल.
Courtesy – cartoq






