राज्य सहकारी बँकेची ऐतिहासिक भरारी! ७०२ कोटींचा निव्वळ नफा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने (MSC Bank) आपल्या प्रगतीचा आलेख उंचावत गत आर्थिक वर्षात ७०२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सुयोग्य जोखीम व्यवस्थापन, तांत्रिक आधुनिकीकरण आणि पारदर्शी प्रशासनाच्या जोरावर बँकेने ही उल्लेखनिय कामगिरी केली आहे.

बँकेचा एकूण व्यवसाय ५६,२५० कोटींवर

राज्य सहकारी बँकेचा एकूण व्यवसाय आता ५६,२५० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मात्र, मार्च २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात जागतिक युद्धाच्या पार्श्वभूमीवर रोखे बाजार (Bond Market) कोसळला होता. यामुळे रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार कराव्या लागलेल्या तरतुदींमुळे इतर बँकांप्रमाणेच राज्य बँकेच्याही निव्वळ नफ्यात काही प्रमाणात घट झाली आहे, असे अनास्कर यांनी स्पष्ट केले.

सामाजिक बांधिलकी: शेतकऱ्यांना १० कोटींची मदत

केवळ नफा कमवणे हेच उद्दिष्ट न ठेवता बँकेने सामाजिक उत्तरदायित्वही जपले आहे:

  • अ‍वकाळीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा: अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बँकेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १० कोटी रुपयांची मदत दिली आहे.
  • माजी सेवकांसाठी पेन्शन: सन २०२४ नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १० हजार रुपये निवृत्ती वेतन (Pension) योजना जाहीर करण्यात आली आहे.
  • आरोग्य आधार योजना: हयात असलेल्या सर्व माजी सेवकांना दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी दरमहा ५ हजार रुपये आणि शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.
तंत्रज्ञान आणि सुरक्षा: देशातील पहिले ‘सायबर सिक्युरिटी सेंटर

डिजिटल युगात ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी बँकेने नवी मुंबईतील वाशी येथील प्रशासकीय इमारतीत ‘सहकार सुरक्षा या नावाने देशातील पहिले अत्याधुनिक सायबर सिक्युरिटी सेंटर उभारले आहे. याशिवाय, सर्वसामान्य ग्राहकांसाठी बँकेने आता यूपीआय (UPI) आणि क्युआर कोड (QR Code) सारख्या आधुनिक सेवाही सुरू केल्या आहेत.

प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या नेतृत्वाखाली बँकेने तांत्रिक आधुनिकीकरण आणि कर्मचारी कल्याणासोबतच सामाजिक कार्यातही आपले योगदान दिले आहे. ७०२ कोटींच्या या नफ्यामुळे सहकार क्षेत्रातील राज्य बँकेचे स्थान अधिक बळकट झाले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »