किमान हमी भावाच्या कायद्याखेरीज न्याय मिळणार नाही : राजू शेट्टी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

२०२४ ला मला पुन्हा संसदेत जावे लागणार!


पुणे : शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्यायचा असेल, तर शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमी भाव देऊन त्याला कायद्याची सुरक्षा देण्याखेरीज दुसरा पर्याय नाही, अशी आग्रही भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मांडली.
पुण्यात एस. एम. जोशी सभागृहात आयोजित (गुरुवारी) ‘किमान हमीभाव अनिवार्य कायदा’ या विषयावरील कार्यशाळेमध्ये शेट्टी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेकापचे सरचिटणीस, आमदार भाई जयंत पाटील, एमएसपी गॅरंटी किसान मोर्चाचे अध्यक्ष व्ही. एम. सिंग, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, ॲड. असीम सरोदे, कर्नाटकचे शेतकरी नेते चंद्रशेखर आदींची उपस्थिती होती.

राजू शेट्टी यांनी २०१८ मध्ये लोकसभेत खासगी विधेयक मांडून ‘शेत मालाला किमान हमीभाव अनिवार्य’ हा कायदा करण्याची का गरज आहे याबाबत तपशीलवार मांडणी केली होती. त्यांनी या कार्यशाळेत या कायद्यामागची भूमिका थोडक्यात मांडली. हा कायदा करण्याची गरज आम्हाला का वाटली, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी अन्य दुसरा पर्याय का नाही आदी मुद्यांवर मांडणी केली.

महाराष्ट्रात २०१७ मध्ये झालेला शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप आणि त्याचे लोण मध्य प्रदेशात पसरून शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार आदी घटनांचा उल्लेख करत शेट्टी म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचा आवाज दाबून टाकण्याच्या वृत्तीवर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांनी ठोस भूमिका घेतली पाहिजे या विचाराने दिल्लीमध्ये आम्ही सर्व प्रमुख शेतकरी नेत्यांची बैठक घेतली.’’

Farmer leader Raju Shetti

‘‘त्यावेळी विविध विचारधारेचे नेते उपस्थित होते. मात्र तुमची विचारधारा काहीही असो, ती तुम्ही पुढे न्या; मात्र शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हमीभावाचा कायदा करण्याची गरज आहे की नाही असा सवाल आम्ही सर्वांसमोर केला आणि या एका मुद्यावर सर्व संघटनांचे नेते एकत्र आले आणि आम्ही लढा उभारण्याचे ठरवले. त्यासाठी अशा कार्यशाळांच्या माध्यमातून आम्ही शेतकरी व्यतिरिक्त वर्गासमोर आमची भूमिका मांडून सर्व घटकांचे समर्थन मिळवत आहोत. या कार्यशाळा देशभर होतील. त्याद्वारे आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने जनमत निर्माण करणार आहोत. त्यानंतर सरकारला हा कायदा केल्योखरीज काहीही पर्याय राहणार नाही.’

या कायद्याचा पाठपुरावा करण्यासाठी मला पुन्हा, म्हणजे २०२४ साली लोकसभेत जावे लागणार आहे, असे शेट्टी यांनी म्हणताच, त्याचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार रविकांत तुपकर यांचीही उपस्थिती होती.

एफआरपी रक्कम एकरकमी मिळण्याचे आंदोलन यशस्वी झाल्याबद्दल राजू शेट्टी यांचा पुणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने यावेळी सत्कार करण्यात आला आला.

चंद्रशेखर यांनी कन्नडमधून भाषण केले. त्याचा मराठी अनुवाद त्याचवेळी सादर करण्यात आला. सूत्रसंचालन धमेंद्र पवार यांनी केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »