‘आदिनाथ’च्या लिलावाला तीव्र विरोध; करमाळ्यात शेतकरी-कामगार एकवटले

आवडल्यास ही बातमी शेअर करा

४५० कोटींची मालमत्ता १२२ कोटींमध्ये विकण्यास आक्षेप

करमाळा : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रस्तावित लिलावाविरोधात शेतकरी, सभासद, कामगार आणि ऊस वाहतूकदारांनी एकत्र येत तीव्र विरोध दर्शविला आहे. सुमारे ४५० कोटी रुपयांची मालमत्ता अवघ्या १२२ कोटी रुपयांत विकण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेत, सर्व संबंधितांची थकीत देणी दिल्याशिवाय कारखान्याचा ताबा हस्तांतरित होऊ देणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला.

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या थकीत कर्जवसुलीसंदर्भात डीआरटी न्यायालयाच्या निकालानंतर कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर ‘श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना संघर्ष समिती’च्या नेतृत्वाखाली करमाळा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. न्यायालयीन लढ्यासोबतच रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारीही उपस्थितांनी व्यक्त केली.

विक्री प्रक्रियेच्या वैधतेवर प्रश्न

कारखाना शेतकऱ्यांच्या भागभांडवलातून आणि जमिनीतून उभा राहिला असल्याने विक्रीपूर्वी सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा घेऊन ठराव मंजूर करणे आवश्यक होते, असा दावा संघर्ष समितीने निवेदनात केला आहे. असा ठराव न घेता विक्रीची प्रक्रिया राबविली जात असल्याचा आरोपही समितीने केला. तसेच, डीआरटीतील प्रकरणात कामगार, सभासद आणि अन्य देणेकऱ्यांना पक्षकार न केल्यामुळे त्यांच्या बाजूचा विचार झाला नसल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला.

कामगारांच्या थकीत देण्यांचा मुद्दा ऐरणीवर

कारखान्यातील कायम आणि हंगामी कामगारांची विविध स्वरूपातील सुमारे १३० कोटी रुपयांची देणी थकीत असल्याचा दावा करण्यात आला आहे. वेतन, फरकाची रक्कम, भविष्य निर्वाह निधी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या देण्यांचा यात समावेश असल्याचे सांगण्यात आले. सभासदांची शेअर रक्कम तसेच ऊस वाहतूकदारांची तोडणी व वाहतुकीची बिलेही प्रलंबित असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन

संघर्ष समितीचे दशरथ कांबळे आणि शहाजी देशमुख यांनी कारखाना वाचविण्यासाठी सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन केले. एकमेकांवर आरोप करण्याऐवजी सभासद आणि कामगारांच्या हितासाठी सामूहिक भूमिका घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

मागण्यांची दखल न घेतल्यास वेळप्रसंगी गावोगावी दौरे करून रास्ता रोको आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी शेतकरी, सभासद, कामगार आणि ऊस वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »