‘स्वाभिमानी’चे २५ चे आंदोलन स्थगित

सरकारने मागणी मान्य न केल्यास आता ३ डिसेंबरला ‘चक्का जाम’
पुणे : राज्य सरकारने केलेल्या आवाहनानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २५ नोव्हेंबरचे नियोजित राज्यव्यापी ‘चक्का जाम’ आंदोलन स्थगित केले आहे. संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी यासंदर्भात गुरुवारी घोषणा केली. सरकारचे २९ रोजीच्या बैठकीचे निमंत्रण त्यांनी स्वीकारले आहे.
एफआरपीची रक्कम एकरकमी द्यावी, यंदा टनामागे वाढीव ३५० रुपये द्यावे आदी मागण्यांसाठी ‘स्वाभिमानी’ने १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी ऊसतोड आणि वाहतूक बंद आंदोलन केले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र त्याची सरकारने गंभीर दखल न घेतल्याने २५ नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती.
‘स्वाभिमानी’च्या मागण्यांबाबत सहकारमंत्री अतुल सावे यांनी शेट्टी यांना गुरुवारी पत्र पाठवले. ऊस प्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २९ नोव्हेंबर रोजी आयोजित बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण सावे यांनी शेट्टी यांना दिले असून, २५ रोजीचे आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले आहे.
त्याला प्रतिसाद देताना, शेट्टी यांनी एका व्हिडिओद्वारे कार्यकर्त्यांना उद्देशून निवेदन केले आहे. पोलिस यंत्रणा, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अधिकारी आदी अनेकांनी माझ्याशी संपर्क साधला आणि आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली, आमच्या मागण्यांवर सरकारने २९ ला बैठक ठेवली आहे. तोपर्यंत आंदोलन स्थगित करत आहोत, असे शेट्टी यांनी जाहीर केले.
मात्र या बैठकीमध्ये सरकारने ठोस निर्णय घेतला नाही, तर ३ डिसेंबर रोजी अभूतपूर्व ‘चक्का जाम’ आंदोलन केले जाईल. राज्यात एकही वाहन रस्त्यावर चालू दिले जाणार नाही, असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ आवर्जून पाहावा.