तेरणा कारखान्यातील भंगार विक्रीवरून वाद; सभासदांचा गैरव्यवहाराचा आरोप

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यातील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील भंगार विक्रीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. कारखान्यातील भंगाराचे लिलावाद्वारे विक्री करताना सुमारे १० कोटी रुपयांच्या भंगाराची केवळ ५ कोटी रुपयांत विक्री करण्यात आल्याचा गंभीर आरोप सभासद आणि काही माजी कर्मचाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आरोपानुसार, कारखाना भाडेतत्त्वावर सुरू झाल्यानंतर परिसरातील यंत्रसामग्री व भंगाराची कमी किमतीत विक्री करण्यात आली. या व्यवहारामुळे कारखान्याचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे, गेल्या चार वर्षांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तीवेतन, भविष्यनिर्वाह निधी आणि इतर थकीत देणी अद्याप प्रलंबित असल्याने नाराजी वाढली आहे.
सभासदांनी जिल्हा बँक, सहकार विभाग आणि शासनाने या व्यवहाराची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच कर्मचाऱ्यांची थकीत देणी तातडीने अदा करावीत, अशी मागणी केली आहे. या प्रकरणामुळे कारखान्याच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, येत्या काळात या विषयावर अधिक हालचाली होण्याची शक्यता आहे.





