आगामी गळीत हंगाम वाढीव ऊस क्षेत्राचा राहणार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : येणारा गळीत हंगाम हा वाढीव ऊस क्षेत्राचा असणार आहे. त्यामुळे हंगाम हा जादा उसासह अतिरिक्त साखर उत्पादनाचा राहणार आहे. येत्या हंगामात ५८.२८ लाख हेक्टर क्षेत्रातील उसाचे गाळप होईल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी देशात ५५.८३ हेक्टर क्षेत्रातील उसाचे गाळप झाले होते.


इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) वतीने उपग्रह प्रतिमांचा अंदाज घेऊन येणाऱ्या गळीत हंगामाबाबत नियोजन करण्यात आले. या वेळी झालेल्या बैठकीत विविध राज्यांच्या ऊस क्षेत्राचा आढावा घेण्यात आला. देशभरातील साखर उत्पादक राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उसाचे क्षेत्र, अपेक्षित उत्पन्न, मागील आणि सध्या नोंदणीचे क्षेत्रीय अहवाल, सध्याचा व संभाव्य पाऊस या विषयावर चर्चा करण्यात आली.

यंदाच्या हंगामात जुलैच्या मध्यापर्यंत ४४४ कोटी लिटर इथेनॉलचे करार करण्यात आले आहेत. यापैकी ३६२ कोटी लिटर इथेनॉल हे फक्त साखर उद्योगातून तयार झाले आहे. २०२२ २३ या वर्षाकरिता १२ टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी ५४५ कोटी लिटर इथेनॉलनिर्मितीची गरज आहे. इथेनॉलकडे वळल्यामुळे ४५ लाख टन साखर कमी तयार होऊ शकते, असा अंदाज आहे. इथेनॉलकडे जाणारी साखर वगळता येणाऱ्या वर्षात ३५५ लाख टन साखरेची निर्मिती होऊ शकेल आणि २७५ लाख टन साखरेची देशांतर्गत विक्री होऊ शकेल, असा अंदाज आहे. हा अंदाज पाहता देशाला यंदा ८० लाख टन साखर कोणत्याही परिस्थितीत निर्यात करावीच लागेल तरच अतिरिक्त साखरेचा भार कमी होईल, असा अंदाज साखर उद्योगातील प्रतिनिधींचा आहे.

गेल्या वर्षी उत्तर प्रदेशात २३.८ लाख हेक्टरवर उसाचे क्षेत्र होते. यंदा २३.७२ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षी १३.५० लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस होता, यंदा त्यात वाढ होऊन उसाचे क्षेत्र १४.४१ टक्क्यांवर पोहोचले आहे. कर्नाटकात ५.८५ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस होता. यंदा हे क्षेत्र ६.२५ पर्यंत गेले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्र, कर्नाटकात उसाचे क्षेत्र 7 टक्क्यांनी वाढले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »