आजचे पंचांग

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बुधवार, जून २९, २०२२
युगाब्द : ५१२४
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर आषाढ ८ शके १९४४
सूर्योदय : ०६:०४ सूर्यास्त : १९:२०
चंद्रोदय : चंद्रोदय नहीं
चंद्रास्त : १९:४६
शक सम्वत : १९४४
संवत्सर : शुभकृत्
उत्तरायण
ऋतू : ग्रीष्म
चंद्र माह : ज्येष्ठ
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अमावस्या – ०८:२१ पर्यंत
नक्षत्र : आर्द्रा – २२:०९ पर्यंत
योग : वृद्धि – ०८:५१ पर्यंत
करण : नाग – ०८:२१ पर्यंत
द्वितीय करण : किंस्तुघ्न – २१:३६ पर्यंत
सूर्य राशि : मिथुन
चंद्र राशि : मिथुन
राहुकाल : १२:४२ ते १४:२१
गुलिक काल : ११:०२ ते १२:४२
यमगण्ड : ०७:४३ ते ०९:२३
अभिजित मुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:१५ ते १३:०८
अमृत काल : १०:५२ ते १२:४०

आज ‘सांख्यिकी दिवस’ आहे

प्रसंत चंद्र महालनोबिस हे स्वतंत्र भारताच्या मंत्री मंडळाचे संख्याशास्त्राचे सल्लागार म्हणून त्यांचेकडे दायित्व होते. औद्योगिक उत्पादन वाढवणे व बेरोजगारी कमी करणे ह्यावर त्यांचा विशेष भर होता. त्यांचा गौरव करणे व योगदानाबद्दल २९ जून हा दिवस ‘ सांख्यिकी दिवस’ साजरा केला जातो.
सन १९६८ मध्ये त्यांना ‘ पद्म विभूषण ‘ सन्मानाने गौरवण्यात आले.

१८९३ : भारतीय संख्याशास्त्राचे जनक, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट चे संस्थापक प्रसंत चंद्र महालनोबिस यांचा जन्म. (मृत्यू : २८ जून १९७२)

मायकेल मधुसूदन दत्त – हे एकोणिसाव्या शतकातील बंगाली भाषेतील महत्त्वाचे कवी आणि आधुनिक बंगाली नाट्यलेखनाचे प्रणेते म्हणून ओळखले जातात.

ब्रिटिश राजसत्तेची मुहूर्तमेढ भारतात बंगाल प्रांतात रोवली गेली. साहजिकच बंगालमधील अनेक विचारवंत ब्रिटिश आधुनिक शिक्षणपद्धती आणि विचारसरणीने प्रभावित झाले. बंगालमध्ये अनेक क्षेत्रातील तज्ज्ञ या आधुनिक शिक्षणाने प्रेरित होऊन नवनिर्माण करू लागले. मायकेल मधुसूदन दत्त हे यांतीलच एक प्रमुख साहित्यकार होत. शेकपुरा नामक एका छोट्या गावातील मशिदीमध्ये मायकेल यांचे प्राथमिक शिक्षण झाले. येथे त्यांनी फारसी भाषा शिकण्यास सुरुवात केली. लहानपणापासून मायकेल यांना त्यांचे शिक्षक आणि सवंगडी एक हुशार आणि प्रतिभावान विद्यार्थी म्हणून ओळखू लागले.

कोलकातामध्ये शिक्षण घेत असताना मायकेलची ओळख इंग्रजी साहित्य आणि जीवनशैलीशी झाली. कोलकाताच्या हिंदू महाविद्यालयातील एक इंग्रज शिक्षक डेव्हिड लेस्टर रिचर्डसन यांचा मायकेलवर चांगलाच प्रभाव पडला. याच रिचर्डसन यांनी मायकेलला इंग्रजी काव्याची विशेषतः लॉर्ड बायरन या कवीच्या काव्याची गोडी लावली.

साधारण १७ वर्षांच्या वयात मायकेल कविता लिहू लागले. याच काळात त्यांच्यावर यंग इंडिया या चळवळीचा प्रभाव पडू लागला. हिंदू महाविद्यालययाच्या (हे सध्या प्रेसिडेन्सी महाविद्यालय म्हणून ओळखले जाते) काही माजी विद्यार्थ्यांनी अन्याय अत्याचार, अंधश्रद्धा आणि कालबाह्य रुढींच्या विरोधात ही चळवळ उभारली होती. मायकेलवर या चळवळीचा प्रभाव पडू लागल्याचे पाहताच त्याच्या वडिलांनी मायकेलचे लग्न लावून देण्याचा घाट घातला. मायकेलने याविरुद्ध बंड केले. याच काळात मायकेलचा ख्रिस्ती धर्माच्या दिशेने कल झुकू लागला होता.

लग्नाच्या कचाट्यातून सुटायचे म्हणून मायकेल दत्त यांनी ९ फेब्रुवारी १८४३ रोजी ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली. धर्मांतरानंतर त्यांनी मायकेल हे नाव घेतले. मायकेलना हिंदू महाविद्यालय सोडावे लागले. त्यांनी पुढील शिक्षण इंग्लंड येथील बिशप महाविद्यालयातून १८४४ ते १८४७ च्या दरम्यान शिक्षण घेतले. बिशप महविद्यालयात मायकेलने ग्रीक, लॅटिन आणि संस्कृत भाषांचे शिक्षण घेतले.

धर्मांतरामुळे मायकेलना घरातून आर्थिक मदत मिळणे बंद झाले. उपजीविकेसाठी त्यांनी मद्रास पुरुष अनाथालय (१८४८ ते १८५२) आणि मद्रास विश्वविद्यालय माध्यमिक प्रशाला (१८५२- १८५६) येथे अध्यापन चालू केले.

१८५८ ते १८६२ या काळात मायकेल मधुसूदन यांनी कोलकाता येथील न्यायालयात मुख्य दुभाषक म्हणून मुख्य कारकुनाचे पद स्वीकारले. बेथून आणि बायझाक या मित्रांच्या सल्ल्यावरून मायकेल मधुसूदन आपल्या मातृभाषेत साहित्य निर्मिती करू लागले.कोलकातामध्ये असताना मायकेल यांनी ५ नाटके लिहिली, चार काव्ये लिहिली आणि तीन नाटकांचे बंगालीतून इंग्रजीमध्ये अनुवाद केले.

१८६२ ते १८६६ या काळात मायकेल मधुसूदन यांनी वकिलीचा अभ्यास केला. १८६२ मध्ये लंडन येथील ग्रेज इन महाविद्यालयात वकिलीचे शिक्षण सुरू केले. १८६३ मध्ये त्यांचे कुटुंबीय लंडन येथे दाखल झाले. अर्थात आर्थिक चणचणीमुळे मायकेलना आपल्या कुटुंबीयांसहित व्हर्साय या तुलेनेने स्वस्त ठिकाणी स्थायिक व्हावे लागले. १८६५ मध्ये समाज सुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या आर्थिक मदतीमुळे मायकेलना पुन्हा इंग्लंडमध्ये स्थायिक होऊन वकिलीचे शिक्षण पूर्ण करता आले. या मदतीबद्दल मायकेल हे विद्यासागर यांचा अनेकदा दयासागर असा उल्लेख करत. फेब्रुवारी १८६७ मध्ये मायकेल कोलकाता न्यायालयात वकिली करू लागले.त्यांचे कुटुंबीय १८६९ मध्ये भारतात आले.

मद्रास येथे असताना मायकेल दत्त हे हिंदू क्राॅनिकल, मद्रास सर्क्युलेटर, युरेशियन अशा अनेक नियतकालिकांत लिहीत होते. मद्रास स्पेक्टेटर या नियतकालिकाचे ते साहाय्यक संपादक होते. मद्रासमधेच त्यांनी टिमोथी पेनपोएम या टोपण नावाने दोन पुस्तके लिहिली,

बंगाली, तमिळ, तेलुगु , संस्कृत, ग्रीक, लॅटिन आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या मायकेल मधुसूदन दत्त यांनी प्रस्थापित बंगाली साहित्य शैलीला आव्हान दिले आणि लेखनात आधुनिक शैलीचा अविष्कार केला.

बंगाली भाषेत सुनीत ( इंग्रजी : Sonnet) तसेच अमित्राक्षर हे निर्यमक काव्य ( इंग्रजी :Blank Verse) हे प्रकार मायकेल मधुसूदन यांनी बंगाली भाषेत सर्वप्रथम आणले. ‘मेघनाद वध’ हे बंगाली भाषेतील पहिले महाकाव्य. मद्रास येथे असताना टिमोथी पेनपोएम या टोपण नावाने मायकेल मधुसूदन यांनी दोन काव्ये लिहिली. यामध्ये पौरस राजाची कथा सांगणारे एक काव्य आणि पृथ्वीराज संयोगितेच्या कथेवर आधारलेले ‘द कॅप्टिव्ह लेडी’ हे काव्य लिहिले. कोलकाता येथे असताना लिहिलेल्या मेघनादवध या महाकाव्यामुळे मायकेल मधुसूदन हे प्रसिद्धीच्या झोतात आले. ग्रीक महाकवी होमर आणि इटालियन महाकवी दांते यांच्या शैलीची आठवण करून देणाऱ्या, रावणाचा मुलगा मेघनाद याच्या वधाचे वर्णन असणाऱ्या या काव्याचे मूळ भारतीय मातीतले असल्यामुळे भारतीय वाचकांना माहिती असलेल्या विषयाचे नव्या शैलीतील सादरीकरण नावीन्यपूर्ण वाटले.
• १८७३ : बंगाली कवी मायकेल मधुसूदन दत्त यांचे निधन. (जन्म : २५ जानेवारी, १८२४)

बोलणे हा केवळ जगाच्या व्यवहारातील उपचाराचा भाग नाही. बोलण्यातून भाषा, साहित्य, समीक्षा, संस्कृती आणि पर्यायाने त्या समाजाचे उन्नयन होत असते. म्हणूनच वाचिक अभिव्यक्तीकडे गांभीर्याने पाहायला हवे.
प्राचार्य शिवाजीराव भोसले- ज्यांच्या ओघवत्या व ओजस्वी वकृत्वाने अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केले, ज्यांना वक्ता दशसहस्त्रेषु म्हंटले गेले, ज्यांनी ५ दशकाहून अधिक काळ आपल्या व्याख्यानमालेतून जनजागृती केली असे व्यासंगी आणि विद्यार्थीप्रिय प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा आज स्मृतीदिन. प्रा.शिवाजीराव अनंतराव भोसले यांची लेखक, उत्कृष्ट वक्ते यासोबतच विद्यार्थीप्रिय प्राचार्य ही एक महत्वाची ओळख. फलटणच्या मुधोजी कॉलेजमध्ये ते सुमारे २५ वर्ष प्राचार्यपदी कार्यरत होते. तत्वज्ञान, तर्कशास्त्र आणि मानसशास्त्र हे कठीण विषय सोप्पे करून शिकवणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

१९८८ ते १९९१ या कालावधीमध्ये त्यांनी औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुपद सांभाळले. प्राचार्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, भारतीय समाजसुधारक, मराठी संत, तर्कशास्त्र, साहित्य, मानसशास्त्र, भारतीय तत्वज्ञान आदि विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्यानं देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. देश-विदेशांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले त्यांचे विद्यार्थी प्राचार्यांचे विचार आणि शिकवणुकीच्या मार्गाचे अनुकरण करत आहेत याचे प्राचार्यांना फार कौतुक वाटायचे.
‘कथा वकृत्वाची’ या पुस्तकात ‘वकृत्वमीमांसा’ ही संकल्पना मनामध्ये ठेवून प्रा. शिवाजीराव भोसले यांनी वैखरी, वकृत्व आणि व्याख्यानांचा लेखांच्या माध्यमातून विविध अंगाने परिचय करून दिला आहे. वकृत्व-कौशल्याचे महत्व सांगतानाच हे कौशल्य प्राप्त कसे करावे, त्यासाठीची पूर्वतयारी, सरांच्या जडण-घडणीची कथा आणि पूर्वीच्या काळातील मोठमोठ्या सभा आपल्या वकृत्वाने गाजवलेल्या वक्त्यांचे अनुभव या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करतात. सर नेहमी म्हणायचे की, ‘मनुष्यप्राणी हा एकच असा सजीव आहे की, ज्याच्याकडे बोलण्याची कला आहे. त्यामुळे हे बोलणे अर्थपूर्ण असायला हवे.’
२०१० : विचारवंत, वक्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले यांचे निधन. (जन्म : १५ जुलै १९२७)

घटना :
१८७१ : ब्रिटिश पार्लमेंटने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा केला.
१९७४ : इसाबेल पेरेन यांनी अर्जेंटिनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
१९७५ : स्टीव्ह वोजनियाक यांनी ऍपल -१ संगणकाचे पहिले प्रोटोटाइप तपासले.
१९७६ : सेशेल्सला इंग्लंड पासून स्वातंत्र्य मिळाले.
१९८६ : आर्जेन्टिना ने १९८६ चा फुटबॉल विश्वकप जिंकला.
२००७ : ऍपल ने आपला पहिला मोबाईल फोन, आयफोन प्रकाशित केला.

• मृत्यू :
• १९६६ : प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत आणि इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी यांचे निधन. (जन्म : ३१ जुलै, १९०७)
• १९८१ : मराठी साहित्यिक दि.बा. मोकाशी यांचे निधन. (जन्म : २७ नोव्हेंबर,१९१५)
१९९२ : सर्वोदयी कार्यकर्ते शिवाजीराव भावे यांचे निधन.
• १९९३ : चिमणराव-गुंड्याभाऊ मधील गुंड्याभाऊची भूमिका अमर करणारे गायक आणि अभिनेते विष्णुपंत जोग यांचे निधन. (जन्म : १८ सप्टेंबर, १९०५)
• २००० : ऐतिहासिक कादंबरीकार कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचे निधन. (जन्म : १८ फेब्रुवारी, १९११)
• २००० : मराठी- हिंदी रंगभूमी चित्रपट अभिनेत्री माणिक मुदलियार तथा माणिक कदम यांचे निधन.

जन्म :
१८६४ : शिक्षणतज्ज्ञ व वकिल आशुतोष मुखर्जी यांचा जन्म.
१८७१ : मराठी नाटककार, विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू : १ जून, १९३४)
१८९१ : प्राच्यविद्यासंशोधक डॉ. प. ल. वैद्य यांचा जन्म. (मृत्यू : २५ फेब्रुवारी १९७८)
१९०१ : क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांचा जन्म. (मृत्यू : १७ डिसेंबर १९२७)
१९०८ : बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड यांचा जन्म. (मृत्यू : १९ जुलै, १९६८)
१९३४ : रंगकर्मी, निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक कमलाकर सारंग यांचा जन्म. (मृत्यू : २५ सप्टेंबर, १९९८)

आपला दिवस मंगलमय जावो

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »