जिवंत ऊस उत्पादक शेतकऱ्याला मृत दाखवून रोखले बिल

शहाजहाँपूर (उत्तर प्रदेश )- एका जिवंत शेतकऱ्याला कागदोपत्री मृत घोषित करून त्याचे उसाचे बिल रोखण्याचा भयंकर प्रकार येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणामुळे जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने गटविकास अधिकाऱ्याला निलंबित केले आहे.

‘तुम्ही तर मेलेले आहात, त्यामुळे तुम्हाला पैसे काढता येणार नाहीत’, असे शहाजहाँपूर येथील एका ऊस उत्पादक शेतकऱ्याला ते जेव्हा बँकेत गेले तेव्हा सुनावण्यात आले. बँक प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे पीडित शेतकऱ्याला चांगलाच धक्का बसला आहे.
या प्रकाराबद्दल पीडित शेतकऱ्याने सांतप व्यक्त केला. ते म्हणाले की, मी ऊसाच्या बिलाची रक्कम काढण्यासाठी बँकेत गेलो होतो. मात्र, तेथील अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या वृत्ताने मला धक्काच बसला. कारण, बँकेकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये मला मृत घोषित करण्यात आले होते. याप्रकरणी माध्यमांत वृत्त झळकल्यानंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. तिलहर येथील उपजिल्हाधिकारी यांनी यासंदर्भात महसूल विभागाचे पथक चौकशीसाठी नेमले आहे. त्यानुसार, २०२१ मध्ये तिलहर बीडीओंनी या शेतकऱ्याला मृत घोषित केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.