पंजाबमधील शेतकऱ्यांचा पुन्हा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

उसाची देणी न दिल्यामुळं शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन सुरु आहे. गोल्डन संधार शुगर मिल्स लिमिटेडकडून शेतकऱ्यांना सुमारे 72 कोटी रुपये येणं बाकी आहे. या पैशांच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी दिल्ली-अमृतसर महामार्गाच्या एका लेनवर आंदोलन सुरु केलं आहे.
2019-20 मध्ये 30 कोटी रुपयांची थकबाकी कारखान्यांकडे आहे. अद्याप ते पैसे शेकऱ्यांना मिळाले नाहीत. तसेच 2020-2021 मध्ये सात कोटी रुपयांची थकबाकी, 2021-2022 मध्ये त्यांच्याकडे 35 कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकीत रकमेसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांची देणी न दिल्यास देशव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिली आहे.
दरम्यान, संयुक्त किसान मोर्चा देखील पुन्हा आक्रमक झाला आहे. विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाकडून 31 जुलैला आंदोलन करण्यात आलं होतं. देशातील विविध ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आलं होते. या आंदोलनाला पंजाबमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता. किमान आधारभूत किंमतीच्या बाबतीत केंद्र सरकारनं आश्वासनं दिलं होतं. मात्र, ते आश्वासन सरकारनं पू्ण केलं नाही. तसेच कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते गुन्हे देखील अद्याप मागे घेतली नाहीत या मुद्यावर संयुक्त किसान मोर्चानं आक्रमक पवित्रा घेतला आहे. लखीमपूर खेरी घटनेतील दोषींना शिक्षा, बेकायदेशीर कारवाई करण्यात आलेल्या शेतकर्यांना जामीन मिळावा, शेतकर्यांवर दाखल केलेले गुन्हे रद्द करावेत, या मागण्या संयुक्त किसान मोर्चाने केल्या आहेत.